Sharad Pawar: निवडणुकीच्या निकालानंतर देशातील इंडिया आघाडीत नाराजी; शरद पवारांनी सांगितलं नेमकं कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 19:19 IST2026-05-14T19:17:52+5:302026-05-14T19:19:24+5:30
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्यांपैकी ३ ठिकाणी भाजपने यश मिळवले

Sharad Pawar: निवडणुकीच्या निकालानंतर देशातील इंडिया आघाडीत नाराजी; शरद पवारांनी सांगितलं नेमकं कारण?
पुणे: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्यांपैकी ३ ठिकाणी भाजपने यश मिळवले. मात्र केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपला शक्य झाले नाही. तर काँग्रेसला केवळ एकच ठिकाणी सत्ता मिळवता आली आहे. त्यावरून इंडिया आघाडीत नाराजी असल्याचे दिसून आले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या नाराजी मागचे कारण पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
शरद पवार म्हणाले, काही राज्यांतील निकाल अपेक्षेपेक्षा वेगळे लागले आहेत. नवीन पक्षांना काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे इंडिया आघाडीत काही ठिकाणी नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. NEET पेपरफुटी प्रकरणाबाबत बोलताना पवार म्हणाले, NEET Examination संदर्भात यापूर्वीही गैरप्रकार झाले होते, तरी पुरेशी काळजी घेतली गेली नाही. अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न असून, यामुळे संपूर्ण यंत्रणेतील त्रुटी स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.
हा तर सिरीयल पॅटर्न
पुण्यातील हडपसर भागात एका हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली आहे. पोलीस सध्या त्याबाबत तपास करत आहेत. त्यावरून बोलताना पवार म्हणाले, बॉम्बसदृश्य घटनांमध्ये सिरीयल पॅटर्न दिसत आहे. मात्र पोलिसांनी योग्य वेळी आवश्यक पावले उचलल्याचे त्यांनी सांगितले.
सुनील तटकरे भेटीमागचे कारण
सुनील तटकरे गेल्या महिनाभरापासून भेटीसाठी वेळ मागत होते. स्वतःला निमोनिया झाल्याने उशीर झाला, मात्र तटकरे भेटून गेले, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रफुल्ल पटेल यांच्या क्षमतेबाबत शंका नाही
राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल पटेल यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्याबाबत बोलताना पवार म्हणाले, पटेल यांच्या क्षमतेबाबत शंका नाही मी २०२३ पासून त्यांचे नेतृत्व आणि कामकाज जवळून पाहिले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या संपर्कात?
राष्ट्रवादीचे २२ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर विश्वास नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.