Crime News: स्वस्त दरात गहू देतो; फेसबुक आमिषाचा सापळा फसला; बारामतीत लूटमार करणारी टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:12 IST2026-05-06T15:12:07+5:302026-05-06T15:12:29+5:30
Crime News - फेसबुकवर “बाजारभावापेक्षा स्वस्त गहू” अशी जाहिरात पाहून त्यांनी लिंकवर माहिती भरली.

Crime News: स्वस्त दरात गहू देतो; फेसबुक आमिषाचा सापळा फसला; बारामतीत लूटमार करणारी टोळी जेरबंद
बारामती : स्वस्त दरात गहू देण्याच्या आमिषाने फेसबुक मार्केटप्लेसवरून व्यापाऱ्याला जाळ्यात ओढून, शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करून लूटमार करणाऱ्या टोळीला बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करत धडाकेबाज कामगिरी केली. सतत ठिकाणे बदलणाऱ्या आरोपींचा माग काढत, पाच स्वतंत्र पथकांच्या समन्वयातून पोलिसांनी थरारक पाठलाग करून ही कारवाई यशस्वी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी संजय माने (रा. वंजारवाडी), श्रीकांत अर्जुन घुले (रा. ढेकळवाडी), अभिषेक भाऊसो ठोंबरे (रा. ढेकळवाडी) आणि अतुल मोहन भोलणकर (रा. वंजारवाडी, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तासगाव (जि. सांगली) येथील सुरज सर्जेराव गावडे (वय २७) हे गव्हाच्या पीठाच्या व्यवसायात आहेत. फेसबुकवर “बाजारभावापेक्षा स्वस्त गहू” अशी जाहिरात पाहून त्यांनी लिंकवर माहिती भरली. त्यानंतर बनावट फेसबुक अकाउंटवरून संपर्क साधत आरोपींनी त्यांना बारामती येथे बोलावले. ४ मे २०२६ रोजी गावडे हे छोटा हत्ती टेम्पो व चालकासह रोख रक्कम घेऊन बारामतीत दाखल झाले. फोनवरील सूचनांनुसार त्यांना पेन्सिल चौक व नंतर कल्याणी कॉर्नर येथे बोलावण्यात आले. येथे एका संशयिताने “शेठने पाठवले आहे”, असे सांगत त्यांना स्कुटीवरून निर्जन ठिकाणी नेले. तेथे आधीच चारचाकीत इतर आरोपी थांबलेले होते.
निर्जन प्लॉटमध्ये पोहोचताच आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवत दोघांनाही मारहाण केली. गावडे यांच्या कपाळावर पिस्तूल रोखून त्यांच्याकडील २५,५०० रुपये रोख, चांदीच्या अंगठ्या, घड्याळ आणि चालकाच्या कानातील सोन्याची बाळी काढून घेतली. सुमारे ५१,५०० रुपयांचा मुद्देमाल लुटून आरोपी फरार झाले. “पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारू,” अशी धमकीही देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्त्वाखाली पथक तत्काळ रवाना झाले. सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. टोलनाक्यावरील सीसीटीव्ही तपासात आरोपींची कार पाटसच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आरोपींनी शिरसुफळ, गाडीखेल, पारवडी, खडकी, रावणगाव, कुरकुंभ, भिगवण, निरगुडे, लाकडी, कळस, डाळज, भाडलवाडी अशा विविध मार्गांनी सतत हालचाल केली. पोलिसांनी या सर्व ठिकाणी नाकाबंदी करत जाळे आवळले.
थरारक पाठलागानंतर मुसक्या आवळल्या
भिगवण, वालचंदनगर व बारामती पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सिन्नरमास कंपनी परिसरात आरोपींच्या गाडीला घेराव घातला. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच आरोपींनी वेग वाढवला. मात्र, पोलिसांनी शिताफीने रात्री सुमारे ८:५० वाजता तीन आरोपींना गाडीसह ताब्यात घेतले. चौथा आरोपी अतुल भोलणकर याला नंतर घरातून अटक करण्यात आली. या कारवाईत आरोपींकडून सुमारे ७.५० लाखांचे सोने-चांदीचे दागिने, घड्याळ, ६५ हजार रुपये रोख रक्कम, तसेच जिवंत काडतुसांसह दोन पिस्तुले जप्त करण्यात आली.
पोलिसांच्या टीम वर्कची झलक
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बारामती, भिगवण, वालचंदनगर पोलिसांसह सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय साधत ही कारवाई यशस्वी केली. या धडाकेबाज कारवाईमुळे बारामती तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून, सोशल मीडियावरील आमिषांना बळी न पडण्याचे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे.