हात धुणं ही एक अतिशय साधी सवय वाटते. यासाठी ना जास्त वेळ लागतो, ना कोणत्या खास साधनाची गरज भासते. तरीही ही छोटीशी सवय आपल्याला अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून वाचवू शकते. म्हणूनच डॉक्टर वारंवार हात धुण्याचा सल्ला देतात. ही केवळ पर्सनल स्वच्छतेची बाब नसून संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी निगडित एक महत्त्वाचं पाऊल आहे. लसीकरण आणि अँटीबायोटिक्स येण्यापूर्वीच्या काळातही हात धुण्याच्या सवयीने लोकांचा जीव वाचवण्यात मोठी भूमिका बजावली होती. कोरोना महामारीच्या काळातही हीच गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली की, स्वच्छ हात ही इन्फेक्शनची चेन तोडण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
हात धुणं का गरजेचं आहे?
आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तूंना स्पर्श करतो, जसं की दरवाजाचे हँडल, फोन, पैसे, रेलिंग किंवा कोणाशी तरी हस्तांदोलन करणं. या सर्व गोष्टींवर सूक्ष्म जीव असू शकतात. डॉ. प्रतीक गोपानी यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी (TOI) बोलताना सांगितलं की, अनेक लोक हात धुण्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत, मात्र ही सवय अनेक गंभीर इन्फेक्शनपासून वाचवते आणि संपूर्ण आरोग्य सुधारते. जेव्हा हे अस्वच्छ हात चेहरा, डोळे, नाक किंवा तोंडापर्यंत पोहोचतात, तेव्हा हे जीव शरीरात प्रवेश करतात आणि आजार सुरू होतात.
यामुळे कोणते आजार पसरतात?
अस्वच्छ हातांमुळे कॉलरा, टायफॉइड, जुलाब (डायरिया) आणि इन्फ्लूएंजा सारखे आजार पसरतात. विशेष म्हणजे इन्फेक्शन केवळ अस्वच्छ वातावरणातच होतं असं नाही, तर स्वच्छ दिसणाऱ्या ठिकाणीही ते असू शकतं. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे.
संशोधनात काय समोर आलं?
'सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन' (CDC) नुसार, योग्य पद्धतीने हात धुण्यामुळे इन्फेक्शनचा धोका सुमारे २० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. ज्या देशांमध्ये स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेच्या चांगल्या सुविधा आहेत, तिथे इन्फेक्शनच्या प्रकरणांमध्ये मोठी घट दिसून आली आहे.
'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
अनेकदा लोक दैनंदिन जीवनातील अशा छोट्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करतात जिथे हात धुणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, शौचालय वापर केल्यानंतर, स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा जेवणाआधी, अन्न पदार्थ हाताळल्यानंतर, खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर, पाळीव प्राणी किंवा कचऱ्याला स्पर्श केल्यानंतर आणि बाहेरून घरी आल्यावर हात धुणं आवश्यक आहे. मुलं आणि वृद्धांसाठी ही सवय अधिक महत्त्वाची आहे, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असते.
हात धुण्याची योग्य पद्धत
हात धुणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकीच ते धुण्याची पद्धतही महत्त्वाची आहे. किमान २० सेकंद साबण आणि पाण्याने हात धुतले पाहिजेत. तळहात, हाताच्या मागची बाजू, बोटांमधील जागा आणि नखांच्या खालचा भाग व्यवस्थित स्वच्छ करावा. साबण घाण आणि जंतू काढून टाकण्यास मदत करतो, तर केवळ पाण्याने हात धुणं पुरेसं नसतं. जर साबण उपलब्ध नसेल, तर अल्कोहोल-आधारित सॅनिटायझर वापरता येतं, पण तो साबणाला पूर्ण पर्याय ठरू शकत नाही.
