पुण्यात माओवादी कमांडर माडवी हिडमाच्या गाण्यावर नृत्य? वसतिगृहातील सांस्कृतिक कार्यक्रम वादात; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:28 IST2026-04-14T11:27:44+5:302026-04-14T11:28:16+5:30
‘जंगल का राजा हिडमा’ सादरीकरणानंतर खळबळ; प्रशासन सतर्क

पुण्यात माओवादी कमांडर माडवी हिडमाच्या गाण्यावर नृत्य? वसतिगृहातील सांस्कृतिक कार्यक्रम वादात; नेमकं काय घडलं?
पुणे : विश्रांतवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामुळे वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी “ओ रे बंदूक वाले” या गाण्यावर नृत्य सादर केले. संबंधित गाण्यात माओवादी कमांडर माडवी हिडमा याचे कथित गौरवगान असल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. या दरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
अधिकच्या माहितीनुसार, सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान ‘जंगल का राजा हिडमा’ या नावाचे नाट्यसादरीकरणही करण्यात आले होते. गाण्यातील “वापस आजा हिडमा, जंगल के चोरों ने घेरा हिडमा, ग्रीन हंट की बंदूक ने मारा हमको” या ओळींमुळे कुख्यात माओवादी नेत्याचे उदात्तीकरण होत असल्याची चर्चा सुरू झाली. या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले. या घटनेची दखल पुणे पोलीस, दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि समाजकल्याण विभागाने घेतली आहे. या प्रकरणामागे कोणत्याही नक्षलवादी विचारसरणीचा प्रभाव आहे का ? तसेच शहरातील तरुणांना दहशतवादी कृत्यांकडे वळविण्याचा कोणताही कट होता का ? याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
माध्यमांशी बोलतांना समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हे गाणे विद्यार्थ्यांकडून अनवधानाने निवडले गेल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांनी यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या गाण्यांमधून केवळ त्याचे संगीत आवडल्यामुळे त्याची निवड केली होती. या सादरीकरणासाठी कोणतीही पूर्वतयारी नव्हती आणि अवघ्या दहा मिनिटांत हा कार्यक्रम ठरविण्यात आला होता. कार्यक्रमाचा उद्देश पूर्णपणे सांस्कृतिक होता.
विविध भागांतील पारंपरिक पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. या वसतिगृह परिसरात एकूण सात हॉस्टेल्स असून सुमारे १,००० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. परीक्षेनंतर सुमारे ६०० ते ७०० विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी सुमारे ८५ टक्के विद्यार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. दरम्यान, घटनेनंतर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना या प्रकाराचे गांभीर्य समजावून सांगितले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तसेच, कार्यक्रमासाठी आवश्यक अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती, ही बाबही तपासात समोर आली आहे.