पुणे महापालिकेच्या रुग्णालयात ‘बेनटाल शस्त्रक्रिया’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 03:07 PM2020-01-13T15:07:37+5:302020-01-13T15:11:58+5:30

गरीब रुग्णांना दिलासा : लाखो रुपये खर्चूनही जीविताची या शस्त्रक्रियेत नसते हमी... 

'Bantal surgery' at Pune Municipal Hospital | पुणे महापालिकेच्या रुग्णालयात ‘बेनटाल शस्त्रक्रिया’

पुणे महापालिकेच्या रुग्णालयात ‘बेनटाल शस्त्रक्रिया’

googlenewsNext
ठळक मुद्देपावणेतीन तास ‘हार्ट लंग मशीनद्वारे’ शरीरातील रक्तपुरवठा सुरू ठेवत शस्त्रक्रिया

नीलेश राऊत - 

पुणे : हृदयविकारातील सर्वांत किचकट मानली जाणारी तथा ज्या शस्त्रक्रियेत ९० टक्के जीविताची खात्रीही नसते, अशी ‘बेनटाल शस्त्रक्रिया’ नुकतीच पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील हृदयरोग विभागात यशस्वीरीत्या करण्यात आली. खाजगी रुग्णालयांत या शस्त्रक्रियेला पंधरा ते सतरा लाख रुपये खर्च येतो. मात्र येथे ही शस्त्रक्रिया माफक दरात झाल्याने, पालिकेची रुग्णालयेही खाजगी व नामांकित रुग्णालयाच्या तोडीस तोड असल्याचे आधोरेखित झाले आहे.
कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये ‘पुणे महापालिका’ व ‘टोटल हार्ट सोल्युशन वेलनेस’ (टी़एच़एस़) यांच्या संयुक्त विद्यमाने, हृदयरोग विभाग गेल्या सव्वादोन वर्षांपासून चालविला जात आहे़ एक वर्षापूर्वी या ठिकाणी हृदयरोगावरील शस्त्रक्रिया सुरू झाल्या. सी़जी़एच़एस़ (सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्किम) दरात याठिकाणी उपचार केले जात असून, या हृदयरोग विभागाचा लाभ आजपर्यंत पुण्यातील तसेच पुण्याबाहेरील ३५ हजार रुग्णांनी घेतला आहे. पालिकेची रुग्णालये म्हटल्यावर नाके मुरडणाऱ्या अनेकांसाठी हे रुग्णालय तथा हृदयरोग विभाग नवसंजीवनी देणारे तथा अन्य पालिकेच्या दवाखान्यांसाठी पथदर्शक ठरला आहे. या विभागात आजपर्यंत ५० ओपन हार्ट सर्जरी, १ हजार ७३६ अ‍ॅन्जोग्राफी, १ हजार १६२ अ‍ॅन्जोप्लास्टी सर्जरी झाल्या आहेत. सर्व उपचार सी़जीएच.एस. दरातच आहेत.  


.......
काय आहे ही ‘बेनटाल शस्त्रक्रिया’
हृदयातून शुद्ध रक्त पुरवठा करणारी महाधमनी (अडची सेंमी व्यासाची) कमकुवत होते. तेव्हा या रक्तदाबामुळे महाधमनीतील आतील स्तर विशिष्ट ठिकाणी फाटतो व त्याचा परिणाम धमनीतील दुसऱ्या व तिसऱ्या स्तरापर्यंत पोहचल्यावर संबंधित रुग्णाचा मृत्यू होतो. याकरिता हृदयातील वरचा भाग की जेथे महाधमनी जोडलेली असते असा पूर्ण भाग संबंधित रुग्णाला जणू मृत्यूशय्येवर ठेवूनच बदलला जातो. यास ‘बेनटाल शस्त्रक्रिया’ असे संबोधले जाते. या शस्त्रक्रियेत हृदय साधारणत: चार तास बंद असते. यापैकी पावणेतीन तास ‘हार्ट लंग मशीनद्वारे’ शरीरातील रक्तपुरवठा सुरू ठेवत शस्त्रक्रिया सुरू होते. तर सव्वा तास हृदय व शरीरातील रक्त पुरवठा करण्याचे काम पूर्णपणे बंद करून तसेच रक्त गोठवून हृदयाचा खराब भाग बदलून तेथे कृत्रिम भाग बसविला जातो. या काळात संबंधित रुग्ण हा पूर्णपणे मृत अवस्थेतच असतो. तसेच हृदयाचा हा भाग बदलल्यावर पुन्हा त्याला जिवंत करण्याचे दिव्य या शस्त्रक्रियेत करावे लागते.  डॉ़ संदीप तडस यांच्यासह डॉ. प्रदीप शिंदे, भूलतज्ज्ञ डॉ़ वैद्यनाथ महादेवन, हार्टलंग मशिनचे तंत्रज्ञ शशी काळे व अन्य सहकाºयांनी त्यांना मदत केली. 

......
हृदयरोग रुग्णांची वाढती संख्या, न परवडणारा खर्च यामुळे संबंधित रुग्ण या आजाराकडे दुर्लक्ष करीत असताना़, महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील हा हृदयरोग विभाग हृदयरोग्यांना नवसंजीवनी देणारा ठरला आहे  - डॉ. संदीप तडस, हृदयरोगतज्ज्ञ.

............
महापालिकेतर्फे रुग्णालयांच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत असून, या रुग्णालयात सर्वसामान्यांना योग्य व माफक दरात उपचार मिळावेत यासाठी पालिका प्रयत्नशील आहे - सौरभ राव, आयुक्त, पुणे महापालिका.
............

Web Title: 'Bantal surgery' at Pune Municipal Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.