देवदूतासारख्या जवानांनी मृत्यूच्या दारातून बाहेर काढले; कात्रजमध्ये २ भिंतीत अडकलेल्या ७ वर्षीय मुलाची सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:31 IST2026-05-06T11:30:53+5:302026-05-06T11:31:13+5:30
अत्यंत सावधगिरीने हॅड्रोलिक ब्रेकर व घनाच्या साहाय्याने भिंत तोडून, तसेच बोल्ट कटरच्या साहाय्याने भिंतीतील सळ्या कट करून मुलाची सुखरूप सुटका केली.

देवदूतासारख्या जवानांनी मृत्यूच्या दारातून बाहेर काढले; कात्रजमध्ये २ भिंतीत अडकलेल्या ७ वर्षीय मुलाची सुखरूप सुटका
कात्रज: कात्रजमधील जांभूळवाडी परिसरात (दि. ५) दुपारी एका काळजाचा ठोका चुकविणारी घटना घडली. दोन भिंतीच्या मध्ये एक सात वर्षांचा मुलगा पडला आणि तो त्यामध्येच अडकला. त्याला बाहेर काही येत आले नाही. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी देवदूतासारखे धावून येत, त्या मुलाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढले.
जांभूळवाडी रोड येथील गोविंद बेसिल सोसायटीमध्ये दुपारी ३:०९ वाजता रणवीर चेतन चव्हाण (वय ७ वर्षे) खेळता-खेळता दोन भिंतींच्या अरुंद बोळात पडला आणि तिथेच अडकून पडला. घटनेची माहिती मिळताच, कात्रज अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. मुलाची स्थिती लक्षात घेऊन जवानांनी अत्यंत सावधगिरीने हॅड्रोलिक ब्रेकर व घनाच्या साहाय्याने भिंत तोडून, तसेच बोल्ट कटरच्या साहाय्याने भिंतीतील सळ्या कट करून मुलाची सुखरूप सुटका केली.
प्रभारी उपअग्निशमन अधिकारी संतोष भिलारे यांच्या नेतृत्वाखाली फायरमन किरण पाटील, मयूर काटे, प्रशांत कुंभार आणि ड्रायव्हर बंडू गोगावले यांनी शर्थीचे प्रयत्न करून रणवीरला सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या या कामगिरीमुळे परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पालकांनीही आपल्या मुलांच्या खेळाच्या जागांबाबत दक्ष राहणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.