Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोन्याला झळाळी; सराफी बाजारात सोने खरेदीसाठी उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 11:58 IST2026-04-19T11:56:28+5:302026-04-19T11:58:21+5:30
Akshaya Tritiya 2026 - जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती, राजकीय अस्थिरता आणि रुपयाच्या घसरणीमुळे बाजार कडाडला आहे.

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोन्याला झळाळी; सराफी बाजारात सोने खरेदीसाठी उत्साह
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचा मुहूर्त शुभ मानला जातो. या मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास सोने अधिकाधिक वृद्धिगंत होते अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात कितीही चढउतार झाले तरी मुहूर्ताच्या सणासुदीला मध्यमवर्गीयांकडून सोने खरेदी हमखास केली जाते.
यंदाची अक्षय तृतीयादेखील त्याला अपवाद ठरलेली नाही. शनिवारी (दि. १८) अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या किमतीने दीड लाखाचा टप्पा गाठला असतानाही शहरातील लक्ष्मी रोड, सोन्या मारुती चौक अशा विविध भागांतील सराफा दुकानांमध्ये दिवसभर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली, त्यामुळे सराफी व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती, राजकीय अस्थिरता आणि रुपयाच्या घसरणीमुळे बाजार कडाडला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. गतवर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात सुमारे ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही ग्राहकांचा खरेदीकडे कल कायम असल्याचे दिसून येत आहे. आपल्या बजेटनुसार उदा; १ लाखाचे बजेट असल्यास ८ ते ९ ग्रॅमचे सोने खरेदी करण्याला ग्राहक प्राधान्य देत आहेत.
वेढणी, कॉईन यांना मागणी अधिक आहे तर चांदीचे बिस्कीट आणि कॉईन यांना मागणी वाढली असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले. सोन्याचे दर गगनाला भिडल्याने ग्राहकांनी जड दागिन्यांऐजी 'लाइटवेट' (हलक्या वजनाचे) आणि डिझायनर दागिन्यांना अधिक पसंती दिली आहे. विशेषतः १८ कॅरेटमधील नाजूक नेकलेस, ब्रेसलेट आणि कानातल्यांची मागणी वाढली असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी (दि. १९) अक्षय तृतीया आली असल्याने सुट्टीचा दिवस साधत सोन्याच्या खरेदीने सराफा बाजाराला अधिक झळाळी मिळण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
सोन्याचा भाव (दि. १६ एप्रिल)
२४ कॅरेट : १५,३५२ रुपये - प्रतिग्रॅम
२२ कॅरेट : १४,१३८ रुपये - प्रतिग्रॅम
चांदी (किलो) २ लाख ५७ हजार ५०० रुपये
साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतो. त्यामुळे त्याच दिवशी सोने खरेदीला ग्राहक प्राधान्य देतात. सोन्याच्या भावात वाढ झाली असली तरी खरेदीवर कोणताही परिणाम होणार नाही. अक्षय तृतीयेला चांगली खरेदी होईल. - अभय गाडगीळ, संचालक, पीएनजी एक्सलुसिव्ह, नळस्टॉप
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुवर्ण खरेदीचा शुभमुहूर्त मानल्या जाणाऱ्या या सणानिमित्त ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची अपेक्षा यावर्षी आहे. दरात चढ-उतार असूनही सोन्याबाबतचा विश्वास कायम असून, चंदुकाका सराफ यांनी विविध आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. लग्नसराईच्या हंगामामुळे विक्रीत चांगली वाढ होईल, असा आमचा अंदाज आहे. परिणामी बाजारात तेजीचे संकेत दिसून येत आहेत. - सम्यक किशोरकुमार शह, मॅनेजिंग डायरेक्टर चंदुकाका सराफ
इराण व इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहक प्लॅनिंगनुसार सोने खरेदी करण्यावर भर देत आहेत. एखादा चार ते पाच लाखांचा दागिना घ्यायचा असेल तर डिझाइन निवडतात, बुक करून पेमेंट करतात आणि मग सणाच्या दिवशी घेऊन जातात. गेल्या आठ ते दिवसांत हे चित्र पाहायला मिळत आहे. अक्षय तृतीयेसाठी वेढणीला मागणी आहे. - अतुल अष्टेकर, संचालक के. आर अष्टेकर ज्वेलर्स