भरधाव ट्रॅव्हल्स चढली थेट फुटपाथवर; स्वारगेटजवळ घडला अपघात, दोन महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 18:09 IST2026-04-30T18:08:15+5:302026-04-30T18:09:07+5:30
ट्रॅव्हल्सचे नियंत्रण सुटून अपघात झाला, गाडीने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या

भरधाव ट्रॅव्हल्स चढली थेट फुटपाथवर; स्वारगेटजवळ घडला अपघात, दोन महिला जखमी
पुणे : भरधाव ट्रॅव्हल्स चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट फुटपाथवर चढली. या वेळी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोन महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हा अपघात गुरुवारी (दि. ३०) सकाळी साडेसहाच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती अभिनव चौकात घडला. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालक किरण रामभाऊ कचरे (वय ४२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रॅव्हल्सचालक किरण कचरे हा गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास स्वारगेटहून अभिनव चौकातून पुढे जात होता. त्यावेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. ट्रॅव्हल्सने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या. अपघातात जखमी महिलांच्या डोक्याला व पायाला मार लागला आहे. अपघाताच्या आवाजामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांसह सकाळच्या सत्रात व्यायामासाठी बाहेर आलेल्या नागरिकांनी धाव घेतली. त्यानंतर खडक पोलिसांसह नागरिकांनी जखमी महिलांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातात अत्रे सभागृहाजवळील फुटपाथच्या लोखंडी रेलिंगचे मोठे नुकसान झाले आहे.