भारतीय रिटेल क्षेत्रात 'रिलायन्स रिटेल'ने एक मोठा धमाका केला आहे. रिलायन्सने अभिनेत्री प्रियांका चोप्राचा हेअर केअर ब्रँड 'एनोमली' (Anomaly Haircare) विकत घेतला आहे. यामुळे आता, एनोमलीचे सर्व ट्रेडमार्क, ब्रँड मालमत्ता आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सची मालकी पूर्णपणे रिलायन्स रिटेलकडे आली आहे. महत्वाचे म्हणजे, या व्यवहाराची आर्थिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, ब्युटी आणि पर्सनल केअर क्षेत्रात रिलायन्सची पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने, हा एक मोठा धोरणात्मक निर्णय मानला जात आहे.
२०२१ मध्ये झाली होती सुरुवात -
प्रियांका चोप्राने २०२१ मध्ये 'एनोमली'ची सुरुवात एक Vegan आणि किफायतशीर ब्रँड म्हणून केली आणि उच्च दर्जा तसेच सुरक्षित फॉर्म्युलेशनमुळे या ब्रँडने बघता बघता जागतिक बाजारपेठेत आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. यासंदर्भात माहिती देताना रिलायन्स रिटेलच्या संचालक ईशा अंबानी म्हणाल्या, "एनोमलीला आमच्या पोर्टफोलिओमध्ये सामील करणे हा एक धोरणात्मक निर्णय आहे. रिलायन्स आपल्या 'Tira' सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने या ब्रँडला मोठ्या स्तरावर पोहोचवेल."
प्रियांका चोप्रा क्रिएटिव्ह डायरेक्टर -
महत्वाचे म्हणजे, मालकी बदलली असली तरी प्रियांका चोप्रा या ब्रँडसोबतच राहणार आहे. ती 'क्रिएटिव्ह डायरेक्टर' म्हणून प्रोडक्ट डेवलपमेंट आणि ब्रँड स्ट्रॅटेजीला लिड करेल. यावेळी बोलताना प्रियंका म्हणाली, रिलायन्सच्या अनुभवामुळे भारत, अमेरिका, यूके आणि मध्य पूर्व देशांत ब्रँडचा विस्तार वेगाने होईल. आगामी काळात भारतीय ग्राहकांच्या केसांच्या आणि स्कॅल्पच्या गरजांनुसार नवीन उत्पादने तयार करण्यावर भर दिला जाईल.
