'असं' करुन विरोधी पक्षांच्या मुद्द्यांमधली हवाच काढून घ्या ना!; रोहित पवारांचा भाजपला चिमटा

By मोरेश्वर येरम | Published: December 27, 2020 01:06 PM2020-12-27T13:06:55+5:302020-12-27T13:10:53+5:30

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाला महिना उलटूनही सरकार तोडगा काढू न शकल्याच्या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे.

ncp mla rohit pawar wrote a letter to bjp government over farmers protest in delhi | 'असं' करुन विरोधी पक्षांच्या मुद्द्यांमधली हवाच काढून घ्या ना!; रोहित पवारांचा भाजपला चिमटा

'असं' करुन विरोधी पक्षांच्या मुद्द्यांमधली हवाच काढून घ्या ना!; रोहित पवारांचा भाजपला चिमटा

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन रोहित पवारांचा मोदी सरकारविरोधात आणखी एक लेखशेतकरी आंदोलनावर अद्याप तोडगा न निघू शकल्यानं केली टीकाकृषी कायद्यात हमीभावाचा उल्लेख करण्याची केली मागणी

मुंबई
"केंद्र सरकारला शेतकऱ्यांची एवढीच काळजी आहे तर या कायद्यांमध्ये हमीभावाचा उल्लेख करुन विरोधी पक्षाच्या मुद्द्यांमधली हवाच काढून घ्या ना, यासाठी विरोधी पक्षाने काही सरकारला रोखलेलं नाही", असा चिमटा राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारला काढला आहे.

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाला महिना उलटूनही सरकार तोडगा काढू न शकल्याच्या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे. रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक सविस्तर लेख लिहीलाय. 

"शेतकरी आंदोलनाला तब्बल एक महिना झाला तरी शेतकरी आंदोलनाच्या मुख्य मागण्या अद्यापही केंद्र सरकारच्या लक्षात येत नाहीत ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे हमीभाव! मग हमीभावाबद्दल बोलणं अपेक्षित असताना शेतकरी मालक होईल, शेतकऱ्याला माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळेल अशा इतर गोष्टी सांगण्यातच सरकार वेळकाढूपणा करतंय. पण हमीभावाबद्दल चकार शब्दही काढत नाही. विरोधी पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा कांगावा सरकारकडून केला जातो पण तिन्ही कायद्यांमध्ये हमीभावाच्या संरक्षणाची एक ओळ का टाकत नाही? सरकारला शेतकऱ्यांची एवढी काळजी आहे तर या कायद्यांमध्ये हमीभावाचा उल्लेख करुन विरोधी पक्षाच्या मुद्द्यांमधली हवाच काढून घ्या ना! यासाठी विरोधी पक्षाने काही सरकारला रोखलेलं नाही", असं रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहीलंय.

महाराष्ट्रातील भाजप नेते रेटून खोटं बोलतात
कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांच्या विधानांमध्ये एकमत नसल्याची टीका केली. "महाराष्ट्र भाजपा तर रेटून खोटं बोलण्यात इतकी पुढं गेलीय की आपण काय बोलून जातो याचंही त्यांना भान राहत नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व संपणार नाही, असं केंद्र सरकार म्हणतं आणि दुसरीकडं कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट होत असल्याची ओरड महाराष्ट्र भाजपचे नेते करतात. एकंदरीतच सगळाच सावळा गोंधळ सुरुय", असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

महाविकास आघाडी सरकारने अधिक मदत केल्याचा दावा
राज्यात भाजप सरकार असतानाच्या काळापेक्षा गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने अधिक प्राधान्याने शेतकऱ्यांना मदत केल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. "राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करत नसल्याचा निराधार आरोप विरोधी पक्ष नेहमी करत असतो. याबाबत बघितलं तर गेल्या पाच वर्षात मागील सरकारने शेतकऱ्यांना जवळपास ५३ हजार कोटींची मदत केली होती तर महाविकास आघाडी सरकारने अवघ्या एका वर्षात शेतकऱ्यांना जवळपास ३७ हजार कोटीची मदत केलीय. भाजपा सरकारच्या काळात पाच वर्षात जवळपास जेवढी मदत झाली त्याच्या ६७% मदत महाविकास आघाडी सरकारने अवघ्या एका वर्षात केलीय", असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. 

शेतकरी हा 'शेतकरी' असतो
दिल्लीच्या सीमेवरील आंदोलन हे देशातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन असल्याचं रोहित पवारांनी यावेळी नमूद केलं. "काही लोकं म्हणतात की आंदोलन करणारा शेतकरी हा फक्त उत्तर भारतातील आहे; पण मला या लोकांना सांगायचंय की शेतकरी हा फक्त शेतकरी असतो. त्याला ना जात, ना धर्म, ना प्रदेश असतो. त्यामुळं शेतकऱ्यांविषयी असलेली तुमची भावना ही तुमची विचारसरणी दाखवून देत असते", अशी टीका रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. 

Web Title: ncp mla rohit pawar wrote a letter to bjp government over farmers protest in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.