पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे? अमोल कोल्हे, पार्थ आणि रोहित पवार यांची नावे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:05 IST2026-01-31T13:03:44+5:302026-01-31T13:05:17+5:30

अजित पवारांच्या पश्चात शहराची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, पवार कुटुंबातील सदस्याला जबाबदारी दिली जाणार की खासदार, आमदार अथवा स्थानिक नेत्यावर विश्वास टाकला जाणार

Who is in charge of the NCP in Pimpri-Chinchwad city? The names of Amol Kolhe, Parth and Rohit Pawar are in the discussion | पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे? अमोल कोल्हे, पार्थ आणि रोहित पवार यांची नावे चर्चेत

पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे? अमोल कोल्हे, पार्थ आणि रोहित पवार यांची नावे चर्चेत

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी-चिंचवड शहर ओळखले जात होते. त्याचे नेतृत्व अनेक वर्षे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थपणे सांभाळले होते. मात्र, त्यांच्या अपघाती निधनानंतर शहरातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा नेता कोण, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. अजित पवार यांच्या पश्चात शहराची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, पवार कुटुंबातील सदस्याला जबाबदारी दिली जाणार की खासदार, आमदार अथवा स्थानिक नेत्यावर विश्वास टाकला जाणार, याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

महापालिकेत विरोधात; मात्र संघटनात्मक मरगळ

शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपचा कट्टर विरोधक राहिला आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलून राष्ट्रवादी महायुतीत भाजपसोबत गेली असली, तरी शहर पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये मनोमिलन झालेले कधीच दिसले नाही. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपपासून अंतर ठेवूनच वागत असल्याचे चित्र होते. महापालिकेतील आयुक्त व अधिकाऱ्यांकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने, तसेच प्रभागातील विकासकामे रखडल्याने नगरसेवक व पदाधिकारी अस्वस्थ होते. परिणामी, पक्षसंघटनेत अपेक्षित उत्साहाचा अभाव जाणवत होता.

महापालिका निवडणुकीत अजितदादांची एकहाती लढाई

नऊ वर्षांनंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत अजित पवार यांनी स्वतः निवडणुकीची सूत्रे हाती घेतली. महापालिकेतील भ्रष्टाचार व गैरव्यवहारांचे मुद्दे उपस्थित करत त्यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर थेट आरोप केले. प्रचारात हाच मुद्दा केंद्रस्थानी राहिला. मात्र, या लढाईत शहरातील अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अपेक्षित साथ दिली नाही. गावकी-भावकी, नातेसंबंध, तसेच व्यावसायिक हितसंबंध जपत भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर थेट आरोप करण्याची हिंमत अनेकांनी दाखवली नाही. पक्षातील अनेक माजी नगरसेवकांनी पक्ष सोडल्याने संघटना कमकुवत झाली होती. अशा परिस्थितीतही अजितदादांनी आक्रमक भूमिका घेत संपूर्ण शहर पिंजून काढले आणि राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगवला.

नेतृत्वाची पोकळी आणि चर्चेतील नावे

अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या तोडीचा कणखर नेता शहरात दिसत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नेतृत्वाची पोकळी कोण भरून काढणार, यावरून चर्चांना उधाण आले आहे. पवार कुटुंबातील सदस्याकडे पिंपरी-चिंचवडची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यामध्ये पार्थ पवार, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार, तसेच खासदार अमोल कोल्हे यांची नावे चर्चेत आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार?

महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले होते. अजित पवार, रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी संयुक्तपणे प्रचार केला होता. आता दोन्ही राष्ट्रवादी कायमस्वरूपी एकत्र येतील, अशी चर्चा सुरू आहे. दोन्ही गटांची विभागलेली ताकद एकत्र आल्यास पक्ष संघटना मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महापालिकेतील गटनेता निवडीकडे लक्ष

महापालिकेत राष्ट्रवादीचे ३७ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, गटनेत्याची निवड अद्याप प्रलंबित आहे. गटनेताच विरोधी पक्षनेता असणार असल्याने या पदाला विशेष महत्त्व आहे. स्थायी समितीतील चार जागा, विविध विषय समित्यांमधील सदस्य आणि तीन स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती याबाबतही निर्णय होणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीची सद्य:स्थिती

आमदार : १
महापालिकेतील नगरसेवक : ३७
स्वीकृत नगरसेवक : ३
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा खासदार (शिरूर) : १

Web Title : पिंपरी-चिंचवड एनसीपी नेतृत्व: अमोल कोल्हे, पार्थ, रोहित पवार चर्चा में।

Web Summary : अजित पवार की अनुपस्थिति के बाद, पिंपरी-चिंचवड एनसीपी नेतृत्व अनिश्चित है। पार्थ पवार, रोहित पवार और अमोल कोल्हे संभावित उम्मीदवार हैं। दोनों एनसीपी गुटों का विलय पार्टी को मजबूत कर सकता है।

Web Title : Pimpri-Chinchwad NCP leadership: Amol Kolhe, Parth, Rohit Pawar in discussion.

Web Summary : Following Ajit Pawar's absence, Pimpri-Chinchwad NCP leadership is uncertain. Parth Pawar, Rohit Pawar, and Amol Kolhe are potential candidates. Merger of both NCP factions could strengthen the party.