ICC Women's T20 World Cup 2026 : महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या यजमानखाली जून पासून रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी ३७ वर्षीय शबनीम इस्माइल हिने निवृत्तीचा निर्णय मागे घेत पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलेल्या १५ सदस्यीय विश्वचषक संघात तिचा समावेश करण्यात आला आहे. शबनीम इस्माइल हिने २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, तब्बल तीन वर्षांनंतर तिने पुनरागमन करत विश्वचषक खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स
शबनीम इस्माइल हिने आपल्या जवळपास १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२७ तर आंतरारष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ११३ सामन्यांसह एकमेव कसोटी सामना खेळला आहे. यात तिने एकूण ३१७ विकेट्स घेतल्या आहेत. महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून तिची ओळख आहे.
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
लॉरा वॉल्व्हार्ड नेतृत्व
१२ जूनपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत लॉरा वॉल्व्हार्ड दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. तसेच दुखापतीतून सावरल्यानंतर मॅरिजेन काप आणि डेन व्हॅन नीकर्क यांचीही संघात पुनरागमन झाली आहे. विकेटकीपर फलंदाज कराबो मेसो हिलाही संघात स्थान मिळालं आहे.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
लॉरा वॉल्व्हार्ड (कर्णधार), ताझमिन ब्रिट्स, नदीन डी क्लर्क, ॲनेरी डर्कसेन, शबनीम इस्माइल, सिनालो जाफ्ता, मॅरिजेन काप, अयाबोंगा खाका, सून लुस, कराबो मेसो, नॉनकुलुलेको म्लाबा, कायला रेनेके, तुमी सेखुखुने, क्लो ट्रायॉन, डेन व्हॅन नीकर्क.
भारत-दक्षिण आफ्रिका एकाच गटात
२०२६ महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय संघासोबत 'अ' गटात आहे. या दोन संघाशिवाय ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान आणि नेदरलँड्स संघाचा या गटात समावेश आहे. दक्षिण आफ्रिका १३ जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना २१ जूनला रंगणार आहे.