पिंपरी-चिंचवडकर उकाड्याने हैराण; शहरात आठवड्यातील उच्चांकी ४१ अंश तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:57 IST2026-05-12T15:57:16+5:302026-05-12T15:57:36+5:30

दुपारी रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी होत असून, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे नागरिक टाळत आहेत

Pimpri-Chinchwad residents shocked by heatwave; City records highest temperature of the week at 41 degrees | पिंपरी-चिंचवडकर उकाड्याने हैराण; शहरात आठवड्यातील उच्चांकी ४१ अंश तापमानाची नोंद

पिंपरी-चिंचवडकर उकाड्याने हैराण; शहरात आठवड्यातील उच्चांकी ४१ अंश तापमानाची नोंद

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे कामगारनगरीतील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. आठवड्यातील सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, दिवसभर अंगाची लाही-लाही करणारा उकाडा, सायंकाळी ढगाळ वातावरण आणि रात्री पुन्हा वाढणारा उकाडा अशा बदलत्या वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड कामगारनगरीतील वातावरणात बदल झाला आहे. सकाळीच उन्हाचे चटके जाणवू लागतात. दुपारी रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी होत असून, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे नागरिक टाळत आहेत. आज उन्हाची तीव्रता अधिक होती. दुपारच्या वेळेत पुणे-मुंबई महामार्ग, पिंपरी, चिंचवड, निगडी, थेरगाव, वाकड, पिंपळे सौदागर आणि भोसरीतील मुख्य चौक, पिंपरी कॅम्प बाजारपेठ ओस पडलेले दिसून आले. वाढत्या तापमानामुळे थंड पेये, उसाचा रस, लिंबूपाणी, ताक, आइस्क्रीम आणि फळांच्या रसांना मोठी मागणी वाढली आहे.

सायंकाळी ढगाळ वातावरण तरी...

सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होते. मात्र, उकाड्यात कोणतीही मोठी घट होत नाही. रात्री उशिरापर्यंत उष्ण आणि दमट वातावरण कायम राहत असल्याने नागरिकांची झोपही उडत आहे. घरांमध्ये पंखे, कूलर आणि एसीचा वापर वाढला असून, त्यामुळे वीजवापरातही मोठी वाढ झाली आहे.

आरोग्यावर परिणाम होण्याची भीती

कडक उन्हामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या कामगारांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. उष्माघात, डोकेदुखी, चक्कर येणे, अंगात अशक्तपणा जाणवणे, शरीरातील पाण्याची कमतरता अशा तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नागरिकांनी दुपारच्या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि हलका आहार घ्यावा, असा सल्लाही वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट

दुपारी १२ ते ४ या वेळेत शहरातील अनेक रस्त्यांवर तुलनेने कमी वर्दळ दिसून आली. वाहनचालकही उन्हापासून बचाव करण्यासाठी हेल्मेटसोबत स्कार्फ, गॉगल आणि हातमोजे वापरताना दिसत आहेत. दुचाकीस्वारांना कडक उन्हाचा सर्वाधिक फटका बसत आहे.

हवामानातील बदलांमुळे संभ्रम

दिवसभर तीव्र उन्हानंतर सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण तयार होत असल्याने हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मात्र, ढगाळ वातावरण असूनही पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने उकाड्यात अधिक भर पडत आहे.

नागरिकांसाठी काळजी घेण्याचे आवाहन

महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने नागरिकांना उन्हाळ्यात विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे, भरपूर पाणी पिणे, ओआरएस किंवा लिंबूपाणी घेणे, तसेच लहान मुले आणि ज्येष्ठांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आठवड्यातील तापमान नोंद (अंशांत)

१) दिनांक ४ मे : ३६.०६
२ ) दिनांक ५ मे : ३६.०२

३ ) दिनांक ६ मे : ३६.०५
४ ) दिनांक ७ मे : ३८.०६

५ ) दिनांक ८ मे : ३८.०२
६) दिनांक ९ मे : ३७.०६

७) दिनांक १० मे : ३९.०९
८) दिनांक ११ मे : ४०.०९

Web Title : पिंपरी-चिंचवड में गर्मी का प्रकोप: तापमान 41 डिग्री सेल्सियस तक पहुंचा

Web Summary : पिंपरी-चिंचवड के निवासी भीषण गर्मी से परेशान हैं, तापमान 41 डिग्री सेल्सियस तक पहुंच गया है। नागरिक दोपहर में बाहर निकलने से बच रहे हैं और ठंडे पेय पदार्थों का सहारा ले रहे हैं। डॉक्टर हीटस्ट्रोक से बचने के लिए सावधानी बरतने, हाइड्रेटेड रहने और हल्का भोजन करने की सलाह दे रहे हैं। अनियमित मौसम से परेशानी और बढ़ गई है।

Web Title : Pimpri-Chinchwad Swelters: Week's Highest Temperature of 41 Degrees Recorded

Web Summary : Pimpri-Chinchwad residents are suffering from intense heat, with temperatures reaching a high of 41°C. Citizens avoid midday outings, seeking relief in cool drinks. Doctors advise precautions against heatstroke, urging hydration and light meals. Erratic weather patterns add to discomfort.