पिंपरी शहरात दीडशे बांधकाम व्यावसायिकांना प्रदूषणप्रकरणी महापालिकेच्या नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 16:13 IST2026-05-09T16:13:23+5:302026-05-09T16:13:58+5:30
Pimpari-chinchwad - शहरात सुरू असलेल्या मोठ्या बांधकाम प्रकल्पांमुळे परिसरात धूळ उडणे, रस्त्यांवर माती साचणे आणि हवेची गुणवत्ता खालावणे, याबाबत तक्रारी वाढत आहेत.

पिंपरी शहरात दीडशे बांधकाम व्यावसायिकांना प्रदूषणप्रकरणी महापालिकेच्या नोटिसा
पिंपरी : शहरात वाढत्या बांधकाम प्रकल्पांमुळे होणारे धूळ व वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने कडक नियमावली लागू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर दंडात्मक कारवाईचा आणि बांधकाम परवानगी रद्द करण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. मात्र, याकडे बांधकाम व्यावसायिकांनी दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. अशा दीडशेहून अधिक बिल्डरांना (विकसक) महापालिकेने नोटिसा बजावून बांधकाम थांबवण्याचा इशारा दिला आहे.
शहरात सुरू असलेल्या मोठ्या बांधकाम प्रकल्पांमुळे परिसरात धूळ उडणे, रस्त्यांवर माती साचणे आणि हवेची गुणवत्ता खालावणे, याबाबत तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिक आणि विकसकांना प्रदूषण नियंत्रणासाठी काही सक्तीच्या अटी घातल्या आहेत. मात्र, याकडे बांधकाम व्यावसायिक दुर्लक्ष करत असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे.
कोणत्या भागात जास्त वायुप्रदूषण...
शहरातील वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, भोसरी, चिखली, मोशी, निगडी, पिंपरी आणि तळवडे परिसरात औद्योगिक आणि वाहतूक हालचाली मोठ्या प्रमाणावर होत असल्याने प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यातच मेट्रो, उड्डाणपूल आणि रस्ते विस्ताराची कामे सुरू असल्याने धुळीचे प्रमाण वाढत आहे. बांधकाम साहित्य उघड्यावर ठेवले जात असल्याने वाऱ्यासोबत धूळ उडून वातावरण दूषित होत आहे.
अंमलबजावणीचा अभाव कायम
बांधकामांवर पाणी फवारणी, धूळ रोखण्यासाठी पत्रे बसविणे, रस्ते नियमित स्वच्छ करणे, तसेच इतर नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक भागांत सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात आहे. बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण बांधकामामुळे वायू व ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. बांधकामांवर नियंत्रण ठेवत नियमावली तयार करण्यात आली आहे. रात्री दहा ते सकाळी सातपर्यंत बांधकामे बंद ठेवण्यात येत आहेत. याशिवाय अन्य नियमांनुसार बांधकाम व्यावसायिकांनी काम करावे, असे निर्देश दिले आहेत. नियमावलीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. -सुनील भागवानी, सहशहर अभियंता, महापालिका.