महापौर-आयुक्त सायकलवरून राष्ट्रवादीचे नगरसेवक बैलगाडीतून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 12:34 IST2026-05-16T12:33:35+5:302026-05-16T12:34:39+5:30
- महापालिकेत सर्वसाधारण सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी; सत्तारूढ पक्षनेते आले मेट्रोने; विरोधी पक्षाकडून इंधन दरवाढीचा निषेध; मनसेकडून ५२ कोटी प्रकरणांवर आंदोलन

महापौर-आयुक्त सायकलवरून राष्ट्रवादीचे नगरसेवक बैलगाडीतून
पिंपरी : पंतप्रधानांनी इंधन बचतीच्या आवाहनास महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रतिसाद दिला आहे. सर्वसाधारण सभेसाठी शुक्रवारी (दि. १५) महापौर आणि आयुक्त सायकलने, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे मेट्रोने महापालिकेत दाखल झाले. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी थेट बैलगाडीतून येत इंधन दरवाढीचा निषेध केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेतील कथित ५२ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी निदर्शने केली.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी दुपारी दीडच्या सुमारास महापौर लांडगे आणि आयुक्त डॉ. सूर्यवंशी सायकलवरून महापालिकेत दाखल झाले. सार्वजनिक वाहतूक आणि सायकलचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. सभेस सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे दापोडीपासून मेट्रोने महापालिकेत आले. जागतिक स्तरावर पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले.
इंधन दरवाढीचा निषेध
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे आणि प्रतीक्षा लांघी-जवळकर यांनी बैलगाडीतून महापालिकेत प्रवेश करत लक्ष वेधले. वाढत्या पेट्रोल-डिझेल दरामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून, आता बैलगाडीची वेळ आल्याचा टोला त्यांनी लगावला. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे वाहन चालविणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने नागरिकांवर आर्थिक भार टाकला आहे, अशी टीका आंदोलनकर्त्यांनी केली. बैलगाडीमुळे महापालिका परिसरात काही काळ वाहतूककोंडी आणि गर्दी झाली होती.
मनसेकडून आंदोलन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील कथित ५२ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत आंदोलन केले. यावेळी चुकीच्या पद्धतीने उपसूचनांवर स्वाक्षऱ्या करणाऱ्या नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली. महापालिकेतील भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न सुरू असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला.