सिगारेटचे पैसे मागितल्याने दुकानदाराला पेटवून देण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 16:44 IST2026-04-30T16:43:41+5:302026-04-30T16:44:56+5:30
- संशयितांनी पान टपरीवर सिगारेट ओढल्यानंतर फिर्यादीने पैसे मागितले असता त्यांनी नकार देऊन वाद घातला.

सिगारेटचे पैसे मागितल्याने दुकानदाराला पेटवून देण्याचा प्रयत्न
पिंपरी : सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून टपरीचालकाला जिवंत पेटवून देण्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना सोमवारी (दि.२७) रात्री दहाच्या सुमारास तळवडे येथील गणेशनगरमधील साईरत्न पान शॉप येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली.
याप्रकरणी वैभव चंद्रकांत तांबारे (वय २५, रा. मोशी, पुणे) यांनी मंगळवारी (दि.२८) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सचिन सुनील पुणासे (२५, रा. मेदनकर वाडी, चाकण, पुणे, मूळ गाव बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) आणि भूषण संजय सुरडकर (२५, रा. निघोजे, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. बऱ्हाणपूर मध्य प्रदेश) या दोन संशयितांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी पान टपरीवर सिगारेट ओढल्यानंतर फिर्यादीने पैसे मागितले असता त्यांनी नकार देऊन वाद घातला. त्यानंतर सचिनने फिर्यादीला जिवंत न सोडण्याची धमकी दिली. थोड्या वेळाने दोन्ही दुचाकीवरून पुन्हा आले आणि त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीत आणलेले पेट्रोल फिर्यादीच्या अंगावर ओतून पेटती काडी फेकून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.