पावसाळ्यात हिंजवडी तुंबण्याआधी प्रशासन उपायांसाठी रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 16:29 IST2026-04-26T16:28:33+5:302026-04-26T16:29:47+5:30
- नालेसफाई, रस्ते दुरुस्तीला गती द्या : ‘पीएमआरडीए’ आयुक्तांचे प्रशासनाला आदेश; आमदार, अधिकाऱ्यांसमवेत ‘आयटी’ परिसराची पाहणी पावसाळ्यात हिंजवडी तुंबण्याआधी प्रशासन रस्त्यावर

पावसाळ्यात हिंजवडी तुंबण्याआधी प्रशासन उपायांसाठी रस्त्यावर
पिंपरी : माहिती तंत्रज्ञाननगरी (आयटी हब) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आणि लगतच्या गावांमध्ये पावसाळ्यात उद्भवणारी वाहतूक कोंडी व पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरात पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
महानगर आयुक्तांनी शनिवारी (२५ एप्रिल) या भागाचा पाहणी दौरा केला. भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, अधीक्षक अभियंता प्रशांत पाटील, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहआयुक्त (प्रभारी) हिम्मत खराडे, कार्यकारी अभियंता वसंत नाईक, सह महानगर नियोजनकार सोनाली आहेर, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा परिषद गटविकास अधिकारी सुधीर भागवत, उपअभियंता श्रीधर फणसे, पोलिस निरीक्षक नितीन अंभोरे, हिंजवडीचे ग्रामसेवक अमोल घोळवे, मुळशी तालुका पंचायत समितीचे सभापती मंदा शेळके, उपअभियंता अमित तिडके उपस्थित होते.
मुळशी तालुक्यातील हिंजवडी, माण, मारुंजी, भूगाव आणि पिरंगुट या पट्ट्यात पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था आणि अपूर्ण नालेसफाईमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक ओढे, नाले अतिक्रमणमुक्त करून सफाईची कामे पावसाळ्यापूर्वी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. विशेषतः ‘नांदे चौक’ येथील पावसाळी जलवाहिन्यांचे काम मार्गी लावण्यास सांगितले.
आयटी पार्कमधील वर्दळ लक्षात घेता, मर्सिडीज शोरूम (राष्ट्रीय महामार्ग ४८) ते हिंजवडी फेज-१ या जोडरस्त्याचा विकास वेगाने करण्याबाबत चर्चा केली. लक्ष्मी चौक, कोलते-पाटील रस्ता आणि नेरे-दत्तवाडी-जांबे येथील रस्त्यांचे रुंदीकरण व विकासाचा आढावा घेतला. ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘प्राइड रोड’च्या कामाची आयुक्तांनी पाहणी केली.
स्थानिकांनी मांडल्या समस्या
पाहणी दौऱ्यादरम्यान हिंजवडी, माण, मारुंजी, म्हाळुंगे, नांदे, चांदे आणि जांबे येथील लोकप्रतिनिधींनी आयुक्तांची भेट घेऊन समस्या मांडल्या. या तक्रारींची दखल घेऊन त्या तातडीने सोडविण्याची ग्वाही आयुक्तांनी दिली.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी आयटी पार्क आणि लगतच्या रहिवासी क्षेत्रांतील रस्ते, नाले आणि पावसाळी पाणी व्यवस्थापनाची कामे चोख असणे आवश्यक आहे. नागरिकांना पावसाळ्यात त्रास होऊ नये, यासाठी कामांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. - डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए