Rinku Singh Stars As Knight Riders Beat Lucknow In Super Over : आयपीएल २०२६ स्पर्धेतील रविवारी लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. लखनौच्या इकाना स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात कोलकाताच्या संघाने रिंकूच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर १५५ धावा करत लखनौसमोर १५६ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना मोहम्मद शमीनं अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराच्या मदतीने लखनौ सुपर जाएंट्सनं सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. पण शेवटी कोलकाता नाईट रायडर्सनेच बाजी मारली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सुपर ओव्हरमध्ये केकेआरला मिळाले फक्त २ धावांचे टार्गेट
कोलकाता नाईट रायडर्सकडून सुपर ओव्हरमध्ये सुनील नरेनच्या फिरकीसमोर लखनौच्या फलंदाजांना निभाव लागला नाही. त्याने ३ चेंडूत अवघ्या एका धावेवर LSG चा खेळ खल्लास केला. सुपर ओव्हरमध्ये अवघ्या २ धावांचा पाठलाग करताना रिंकू सिंह याने पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार मारत कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला यंदाच्या हंगामातील दुसरा विजय मिळवून दिला.
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
मोहसिन खानचा 'पंजा'
लखनौ सुपर जाएंट्सचा कर्णधार रिषभ पंतनं घरच्या मैदानातील सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मोहसिन खानने पाच विकेट्सचा डाव साधत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. त्याने आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवत कोलकाताच्या संघाची अवस्था अतिशय बिकट केली होती.
KKR साठी रिंकू सिंह झाला संकट मोचक
अवघ्या ७६ धावांवर अर्धा संघ तंबूत परतला असताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिंकू सिंह याने आपल्या फलंदाजीतील खास नजराणा पेश करत ५१ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने केलेल्या ८३ धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकात नाईट रायडर्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १५५ धावांपर्यंत मजल मारली.
मोहम्मद शमीनं सिक्सर मारत सामना सुपर ओव्हरमध्ये नेला, पण...
या धावसंख्येचा पाठलाग करताना LSG चा कर्णधार रिषभ पंत याने ३८ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. सुनील नरेन याने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. त्याच्याशिवाय एडन मार्करमन २७ चेंडूत केलेल्या ३१ धावांचे योगदान दिले. सामना हातून निसटत असताना हिम्मत सिंग याने १० चेंडूत केलेल्या १९ धावांसह मोहम्मद शमीनं अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकारासह ६ चेंडूत ११ धावांची खेळी करत सामना टाय करत लखनौला सामना जिंकण्यासाठी एक संधी निर्माण केली. पण सुपर ओव्हरमध्ये लखनौच्या संघानं कळण्यापलिकडचा डाव खेळला अन् तीन चेंडूतच त्यांचा खेळ खल्लास झाला. अखेरच्या षटकात १७ धावांचा बचाव करताना कार्तिक त्यागीनं १६ धावा खर्च केल्या. निर्णायक षटकात त्याने सलग दोन नो बॉल टाकल्यामुळे सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट आले.
सुपर ओव्हरमधील थरार, KKR साठी सुनील नरेन ठरला हिरो
लखनौ विरुद्ध कोलकाता यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यावर नियमानुसार, दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या लखनौच्या संघाला टार्गेट सेट करण्यासाठी मैदानात उतरला. LSG नं सुपर ओव्हरमध्ये धावांसाठी संघर्ष करणाऱ्या निकोलस पूरन आणि एडन मार्कम ही जोडी मैदानात उतरली. अजिंक्य रहाणेनं सुपर ओव्हरमध्ये सुनील नरेनवर डाव खेळला. नरेन याने पहिल्याच चेंडूवर पूरनला बोल्ड केले. त्याच्या जागी आलेल्या पंतनं दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर मार्करमची विकेट घेत LSG चा खेळ अवघ्या एका धावेवर खल्लास झाला. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना रिंकू सिंह आणि रोव्हमन पॉवेल जोडी मैदानात उतरली. प्रिन्स यादवच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार मारत रिंकून सुपर ओव्हरमध्ये संघाचा विजय निश्चित केला. दमदार फलंदाजीसह रिंकून क्षेत्ररक्षणा वेळी सर्वाधिक झेल टिपत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.