प्रेमसंबंध, वाद अन् भयावह शेवट..! पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 13:06 IST2026-05-09T12:58:24+5:302026-05-09T13:06:36+5:30
Crime news - सुभान शेख आणि एका तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधाला तरुणीच्या आईचा तीव्र विरोध होता.

प्रेमसंबंध, वाद अन् भयावह शेवट..! पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून
पिंपरी : प्रेमप्रकरणातून थेरगाव परिसरात १९ वर्षीय तरुणाचा शुक्रवारी (दि ८) रात्री खून करण्यात आला आहे. संशयितांनी तरुणावर आणि त्याच्या चुलत भावावर चाकू व चॉपरने हल्ला केला. त्यात सुभान हमीद शेख (वय १९, रा. गुलमोहर कॉलनी, रहाटणी) याचा मृत्यू झाला असून, त्याचा चुलत भाऊ अर्शद रमजान शेख (वय २१, रा. थेरगाव) गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी (दोघेही रा. थेरगाव) यांना अटक केली आहे.
याप्रकरणी मृत सुभानचे वडील हमीद नझीर शेख यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुभान शेख आणि एका तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधाला तरुणीच्या आईचा तीव्र विरोध होता. तरुणीच्या आईचा मित्र असलेला संशयित विशाल सूर्यवंशी याने सुभानला या प्रेमसंबंधातून बाजूला होण्यास सांगितले होते. याच कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता.
शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास थेरगावमधील शिवशंकर कॉलनी आणि श्रीकृष्ण दूध डेअरीसमोरील रस्त्यावर विशाल आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी सुभानला गाठले. त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात संशयितांनी जवळ असलेल्या चाकू आणि चॉपरने सुभानच्या हातावर, पोटावर आणि मानेवर वार केले. या हल्ल्यात सुभानचा मृत्यू झाला. सुभानला वाचविण्यासाठी आलेल्या अर्शदवरही हल्ला करून गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी विशाल आणि अनिकेत यांना अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.