Australian Open : "उह-आया…" आवाजावर आक्षेप! पंचांच्या निर्णयामुळे सेमीफायनलमध्ये हायहोल्टेज ड्रामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 18:30 IST2026-01-29T17:23:00+5:302026-01-29T18:30:37+5:30
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील महिला एकेरीच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या महिला एकेरीतील पहिल्या सेमी फायनलमध्ये बेलारुसची आर्यना सबालेंका आणि युक्रेनची स्टार एलीना स्वितोलिना यांच्यातील सामन्यादरम्यान कोर्टवर तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

आर्यना सबालेंका आणि युक्रेनची स्टार एलीना स्वितोलिना यांच्यातील लढत कोर्टवर उतरण्या आधी हस्तांदोलन टाळण्याच्या वादाासून सुरु झाली. दोघींनी सामन्यानंतरही एकमेकींसोबत हस्तांदोलन करणं टाळल्याचे पाहायला मिळाले.

दोघी परंपरेनुसार, मॅच आधी फोटोसाठीही एकत्र आल्याचे पाहायला मिळाले नाही. इथं जाणून घेऊयात त्यामागचं कारण आणि मॅचसंदर्भातील सविस्तर माहिती

२०२२ पासून सुरू असलेल्या रशिया–युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, युक्रेनियन खेळाडू आणि रशियन/बेलारूसच्या खेळाडूंमध्ये तणावपूर्ण वातावर पाहायला मिळते. याच कारणामुळे दोघींनी एकमेकींसोबत हस्तांदोलन करण्यासोबतच फोटो सेशन करणं टाळण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले.

कोर्टवरील कामगिरीसह आपल्या स्टाइल स्टेटमेंटमुळे चर्चेत असलेल्या बेलारुसच्या सुंदरीनं आपला टेनिस जगतातील दबदबा कायम राखल्याचे पाहायला मिळाले.

युक्रेनची एलीना स्वितोलिना ही आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅमचे स्वप्न साकार करण्यासाठी कोर्टवर उतरली होती. पण १२ व्या मानांकित खेळाडूला सेमी फायनलचा अडथळा पार करता आला नाही.

दुसऱ्या बाजूला अव्वल मानांकित आर्यना सबालेंका हिने मेलबर्नच्या कोर्टवरील आपला जलवा कायम राखत चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल गाठली आहे.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये नंबर वन आर्यना सबालेंका हिने लौकिकाला साजेसा खेळ करताना युक्रेनच्या एलिनाला ६-२, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत फायनल गाठली आहे.

महिला टेनिसमध्ये रॅलीदरम्यान ताकदीनं फटका मारताना खेळाडू मोठ्याने आवाज काढतात, हे नवीन नाही. मात्र यावेळी आर्यना सबालेंकाने काढलेल्या असामान्य आवाजावर पंचांनी आक्षेप घेतला आणि त्यामुळे सेमीफायनल लढतीत कोर्टवर हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

पहिल्या सेटमधील चौथ्या गेमच्या सुरुवातीलाच जेव्हा स्वितोलिना सर्व्ह करत होती. रॅली रंगात आली असताना आणि स्वितोलिना रिटर्न शॉटसाठी सज्ज होत असतानाच पंचांनी अचानक खेळ थांबवला. माईकवरून त्यांनी, स्टॉप, हिंड्रन्स (hindrance)” असं जाहीर केलं. या अचानक निर्णयामुळे सबालेंका आणि स्वितोलिना दोघीही चक्रावून गेल्या. जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू सबालेंकानं आश्चर्य व्यक्त करत थेट “व्हॉट?” अशी प्रतिक्रिया दिली.

टेनिसमध्ये हिंड्रन्स (hindrance) म्हणजे खेळादरम्यान एखाद्या खेळाडूच्या कृतीमुळे प्रतिस्पर्ध्याच्या शॉट खेळण्याच्या क्षमतेत अडथळा निर्माण होणे. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या (ITF) नियम क्रमांक २६ नुसार याची व्याख्या करण्यात आली आहे. नियमांनुसार, जर हिंड्रन्स जाणीवपूर्वक (deliberate) केल्याचं पंचांच्या लक्षात आलं, तर प्रतिस्पर्ध्याला थेट पॉइंट दिला जातो. मात्र, हिंड्रन्स अनवधानाने (accidental) घडल्यास तो पॉइंट पुन्हा खेळवला जातो.

















