फक्त Blue Tick च्या नाही तर सर्व Twitter युजर्सना भरावे लागेल शुल्क, रिपोर्टमध्ये दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 10:13 AM2022-11-09T10:13:31+5:302022-11-09T10:28:43+5:30

Twitter : सर्व युजर्सना ट्विटर ऍक्सेस करण्यासाठी पैसे द्यावे लागू शकतात, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियात सध्या ट्विटरची (Twitter) जोरात चर्चा सुरू आहे. ट्विटरवर अनेक बदल केले जात आहेत. ट्विटरवर ब्लू टिक युजर्सला शुल्क भरावे लागणार असल्याची बातमी यापूर्वी आली होती.

आता आणखी एक नवीन बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये सर्व युजर्सना ट्विटर ऍक्सेस करण्यासाठी पैसे द्यावे लागू शकतात, असे म्हटले आहे. इलॉन मस्क (Elon Musk)यांनी अलीकडच्या काळात ट्विटरबाबत अनेक निर्णय घेतले आहेत. परंतु, जर सर्व युजर्ससाठी शुल्काची घोषणा केली गेली, तर यामुळे बरेच काही बदलेल.

प्लॅटफॉर्मरच्या (Platformer) रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, इलॉन मस्क हे बहुतेक युजर्सकडून सदस्यता शुल्क (सब्सक्रिप्शन फी) आकारण्याची योजना आखत आहे. बहुतेक किंवा सर्व युजर्सना ट्विटर वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील. तर ट्विटर ब्लूसाठी (Twitter Blue) युजर्सना वेगळे सबस्क्रिप्शन शुल्क भरावे लागेल.

ट्विटर ब्लू सह युजर्सना ब्लू टिक आणि इतर अतिरिक्त फीचर्स दिली जातील, असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आहे.

रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, युजर्स एका महिन्यात मर्यादित काळासाठीच ट्विटर वापरण्यास सक्षम असतील. मर्यादित कालावधी संपल्यानंतर युजर्सना कंपनीचा प्लॅन घ्यावा लागेल.

हा प्लॅन घेतल्यानंतरच यूजर्स ट्विटरचा वापर करू शकतील. मात्र, हा प्लॅन कधी लागू होणार हे सध्या स्पष्ट नाही. इलॉन मस्क यांनी याबाबत सार्वजनिकरित्या काहीही सांगितलेले नाही.

सध्या ट्विटरचे इंजीनिअर्स ब्लू सबस्क्रिप्शनवर काम करत आहेत. यामुळे, जर प्लॅटफॉर्म सर्व युजर्सकडून पैसे घेण्याचा विचार करत असेल, तर ते सध्या होणार नाही.

दरम्यान, इलॉन मस्क यांनी नुकतेच अनेक देशांमध्ये ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन जारी केले आहे. मात्र, ते अद्याप सर्व युजर्ससाठी जारी करण्यात आलेले नाही. पण, इलॉन मस्क यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की, ते एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत सर्व युजर्ससाठी जारी केले जाईल.