तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 11:11 AM2024-06-16T11:11:54+5:302024-06-16T11:12:23+5:30

रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला दत्ता कायद्याचा विद्यार्थी आहे. मात्र, तरीही तो या रॅकेटचा मास्टरमाईंड आहे.

Talathi Exam Scam Mastermind Jailed | तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

छत्रपती संभाजीनगर:  स्पर्धा परीक्षांच्या घोटाळ्यांचा मास्टरमाईंड दत्ता कडूबा नलावडे (२७, रा. भालगाव) हा तब्बल नऊ महिन्यांनंतर एमआयडीसी सिडको पोलिसांच्या हाती लागला आहे. शनिवारी सकाळी मिलकॉर्नर परिसरात निवांत फिरताना आढळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सप्टेंबरमध्ये शहरात तलाठी परीक्षेसह विविध स्पर्धा परीक्षांचे घोटाळे समोर आले. तेव्हापासून दत्ता पोलिसांना गुंगारा देत होता.

५ सप्टेंबर रोजी चिकलठाण्यातील आयऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेर राजू भीमराव नागरे (२९, रा. कातराबाद) याला पोलिसांनी रंगेहाथ उत्तरे पुरवताना पकडले. त्यानंतर यात टीसीएस कंपनीच्याच कर्मचाऱ्यांच्या सहभागातून हा घोटाळा होत असल्याचे तत्कालीन उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या तपासात निष्पन्न झाले होते. यात पर्यवेक्षक शाहरुख युनूस शेख (२७, रा. भायगाव, वैजापूर), पवन सुरेश सिरसाट (२६, रा. ब्रिजवाडी), सफाई कर्मचारी बाली रमेश हिवराळे व विकी रोहिदास सोनवणे यांना अटक करण्यात आली होती. दत्ता पसार झाला होता.

रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला दत्ता कायद्याचा विद्यार्थी आहे. मात्र, तरीही तो या रॅकेटचा मास्टरमाईंड आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शाहरुख, पवनसोबत त्याची मैत्री झाली. दत्ताने खुबीने दोघांना केंद्रावर पर्यवेक्षकाची नोकरी लावली होती.

परीक्षेच्या आदल्या दिवशी दत्ता, विकी बालीकडे मोबाइल दिला जात होता. राज्यातील कुठल्याही सेंटरवरून पेपर फोडून तो नागरेला पाठवला जायचा. नागरे इतरांकडून त्याची उत्तरे मिळवून बालीच्या मोबाइलवर पाठवायचा. बाली चेजिंग रूममध्ये जाऊन एका कागदावर उत्तरे लिहून शाहरुख, पवनच्या माध्यमातून परीक्षार्थीपर्यंत उत्तरे पुरवत असे.

Web Title: Talathi Exam Scam Mastermind Jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा