केस पातळ आहेत पण हळदीकुंकू, लग्नसमारंभासाठी सुंदर अंबाडा घालायचाय? बघा ६ सुपरट्रेण्डी प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2024 06:03 PM2024-01-20T18:03:14+5:302024-01-20T18:07:24+5:30

संक्रांतीचं हळदीकुंकू अजून महिनाभर सुरूच असणार आहे. शिवाय लग्नसराईही आहेच. घरच्या हळदी- कुंकू कार्यक्रमासाठी किंवा लग्नसमारंभासाठी तयार होताना अनेकींना छान पारंपरिक पद्धतीने नटायचं असतं.

त्यामुळे मग त्यावर सूट होईल असा अंबाडा घालायचा असतो. पण केस पातळ असतील तर अनेकजणी बन किंवा जुडा हेअरस्टाईल करणे टाळतात. म्हणूनच आता अंबाडा घालण्याचे काही प्रकार पाहून घ्या. यामुळे केस पातळ असले तरी तुम्हाला खूप छान पद्धतीने बन किंवा जुडा हेअरस्टाईल करता येईल.

हा एक पहिला प्रकार पाहा. यामध्ये आतला अंबाडा आकाराने लहानच आहे. पण त्याच्यावर फुलांच्या माळा लावून त्याला मोठं करण्यात आलं आहे.

यामध्ये एक साधं मोठ्या आकाराचं क्लचर मध्यभागी लावलं आहे आणि त्याभोवती केस गुंडाळून टाकले आहेत. यामुळे तुमचा अंबाडा मोठा वाटतो. नंतर एखादं फूल किंवा एखादी हेअर ॲक्सेसरी लावून ते क्लचर झाकून टाकता येतं.

अशी हेअरस्टाईलही करता येईल. यामध्ये केसांना खाली रबर लावून फक्त फुगवलं किंवा पसरवून टाकलं आहे आणि समाेरच्या बाजुने सागरवेणी घालून ती मागे अंबाड्याला जोडली आहे.

ही खोपा पिन आहे. पण हल्ली साधा अंबाडा घालून त्याला अशी खोपा पिन लावून टाकण्याचा खूप ट्रेण्ड आहे. तुम्हाला पाहिजे तर अंबाड्याभोवती गजरा लावू शकता. किंवा न लावता नुसती अशीच हेअरस्टाईल ठेवली तरी छान दिसेल.

थोडी डिझायनर पद्धतीची साडी नेसली असेल तर अशा पद्धतीचा फ्रेंच रोलही घालू शकता. फ्रेंच रोलसाठी केस लांब किंवा जाडच असावेत, असं काही नाही.

डिझायनर वेअर साडी किंवा घागरा- लेहेंगा घातला असेल तर असा साईड जुडाही छान दिसतो. शिवाय तो जाड केसांऐवजी पातळ केसांचाच अधिक शोभून दिसतो.