ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 08:36 AM2024-06-15T08:36:34+5:302024-06-15T08:37:53+5:30

राज्यातील राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

hingoli former mla jai prakash mundada joins shiv sena eknath shinde faction | ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मुंबई : नुकताच लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाला. यात भाजप प्रणित 'एनडीए'ला बहुमत मिळाले. यानंतर आता राज्यातील राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यादरम्यान, शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी (ता. १४) हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जयप्रकाश  मुंदडा यांचे स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जयप्रकाश मुंदडा हे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून सलग ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. याशिवाय, ते राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री देखील होते. 

जयप्रकाश मुंदडा यांची हिंगोलीत मोठी ताकद आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते नाराज होते. आपल्याला पक्षात डावलले जात असल्याचा आरोप जयप्रकाश  मुंदडा यांनी केला होता. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) यांनी देखील आपल्याला विश्वासात घेतलं नाही. लोकसभा निवडणुकीत परस्पर उमेदवार जाहीर केला, अशी नाराजी जयप्रकाश मुंदडा यांनी बोलून दाखवली.

याचबरोबर, ठाकरे गटात कुणीही आपलं म्हणणं ऐकून घेत नसल्याने शेवटी कंटाळून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे जयप्रकाश मुंडदा यांनी सांगितले. दरम्यान, जयप्रकाश मुंडदा यांनी पक्षात प्रवेश केल्याने हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: hingoli former mla jai prakash mundada joins shiv sena eknath shinde faction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.