WHO GCTM: काय आहे WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन? भारतासाठी ठरणार 'गेम चेंजर'...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 04:21 PM2022-04-19T16:21:03+5:302022-04-19T16:25:39+5:30

WHO GCTM: गुजरातच्या जामनगरमध्ये तयार होणाऱ्या या केंद्राचे वैशिष्ट्य काय? याला गेम चेंजर का म्हणत आहे? याचा फायदा सर्वसामान्यांना कसा होणार?

WHO GCTM : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील जामनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन (GSTM) ची पायाभरणी होणार आहे. जगातील अशा प्रकारचे हे एकमेव केंद्र असेल. जगभरातील मोठे तज्ज्ञ याला गेम चेंजर म्हणत आहेत.

काय आहे ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन?- शतकानुशतके भारतात पारंपारिक औषधांचा वापर केला जात आहे. लहान असो वा मोठ्या, प्रत्येक आजारात लोक पारंपारिक औषधे आणि घरगुती उपचारांचा भरपूर वापर करतात. कोरोनाच्या काळातही लोकांनी पारंपारिक औषधी वनस्पती आणि उपायांचा शास्त्रीय पद्धतीने वापर केला, त्याचा त्यांना फायदाही झाला.

आता ही पारंपारिक औषधे आणि उपाचरपद्धती जगासमोर ठेवल्या जातील. जामनगरमध्ये स्थापन होत असलेल्या या केंद्रात पारंपरिक औषधांमध्ये शास्त्रीय पद्धतीने सुधारणा करण्याचे काम केले जाणार आहे. याचा फायदा जगातील इतर देशांनाही होणार आहे. या ठिकाणी केवळ आयुर्वेदिक औषधांवर काम केले जाईल असे नाही. तर, औषधी गुणधर्म असलेले एक्वाप्रेशर आणि अन्नावरही काम केले जाईल.

डब्ल्यूएचओने काय म्हटले?- जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) दक्षिण-पूर्व आशियाचे प्रादेशिक संचालक पीके सिंग यांनी या केंद्राचे वर्णन गेम चेंजर म्हणून केले आहे. ते म्हणाले, पारंपारिक औषधे शतकानुशतके आहेत. WHO च्या 194 सदस्य देशांपैकी 170 मधील सुमारे 80 टक्के लोक त्यांचा वापर करतात.

डॉ. सिंग पुढे म्हणाले, "पारंपारिक औषधांचा व्यापक वापर असूनही, मुख्य प्रवाहात त्यांचा योग प्रकारे वापर होत नाही. आता याच पारंपारिक औषधांचा उपयोग करून, शाश्वत विकास करण्यासाठी WHO चे ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन पाऊले उचलेल. हे येणाऱ्या काळात एक गेम चेंजर ठरू शकते."

आयुर्वेदिक चिकित्सक डॉ. सोमेश पांडे म्हणतात, ''भारताच्या पारंपारिक औषधांमध्ये खूप शक्ती आहे. अॅलोपॅथीने निश्चितपणे बाजारपेठ काबीज केली आहे, परंतु आजही बहुतेक लोकांचा पारंपारिक औषधांवर अधिक विश्वास आहे. यामुळेच येथे प्रत्येकजण घरातील लहानसहान समस्यांसाठी पारंपारिक पद्धतींचा वापर करतो.

परदेशातील प्रत्येक लहानसहान समस्येवर लोक अॅलोपॅथीची औषधे घेतात. अ‍ॅलोपॅथीची औषधे जास्त घेतल्याने होणारे नुकसानही अधिक असते. त्याचे दुष्परिणाम अधिक आहेत, परंतु आयुर्वेदिक औषधांमध्ये असे होत नाही. डॉ. पांडे यांच्या मते, आतापर्यंत फक्त भारतीय लोकांनाच पारंपारिक औषधांबद्दल माहिती होती.

पण, आता या केंद्राच्या स्थापनेनंतर जगातील इतर देशांमध्येही पारंपारिक औषधांचा प्रचार केला जाणार आहे. याचा लाभ सर्वांना घेता येईल. विशेषत: WHO सोबत येण्याचाही फायदा होईल. WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन हे जगातील पहिलेच केंद्र आहे. पारंपारिक औषधांच्या संभाव्यतेला तांत्रिक प्रगती आणि पुराव्यावर आधारित संशोधनाची जोड देणे हे त्याचे ध्येय आहे.

WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसीन पारंपारिक औषध उत्पादनांवर धोरणे आणि मानके सेट करण्याचा प्रयत्न करेल. हे देशांना सर्वसमावेशक, सुरक्षित आणि उच्च दर्जाची आरोग्य प्रणाली तयार करण्यात मदत करते.