आनंदाची बातमी: भारतात पहिल्यांदाच ऍक्टिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 03:18 PM2020-06-10T15:18:13+5:302020-06-10T15:26:30+5:30

देशातील अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, एकट्या महाराष्ट्रानं कोरोनाच्या बाबतीत देशाची चिंता वाढवली आहे.

देशात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णसंख्याही लाखांच्या घरात पोहोचली आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ७६ हजारपर्यंत पोहोचली आहे.

गेल्या २४ तासांत ९,९८५ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. देशातील अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, एकट्या महाराष्ट्रानं कोरोनाच्या बाबतीत देशाची चिंता वाढवली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, एकट्या महाराष्ट्रानं कोरोनाच्या बाबतीत देशाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात जवळपास कोरोना रुग्णांची संख्या ९० हजारांच्या आसपास पोहोचली आहे. असे असतानाही देशात एक समाधानाची बाब समोर आली आहे.

कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं बरे होत असल्याचं दिसून आलं आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे ही एक दिलासादायक बाब असल्याचं सांगितलं जात आहे.

आतापर्यंत देशात एकूण १ लाख ३५ हजार २०६ रुग्ण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत भारतात १ लाख ३३ हजार ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाचं सर्वाधिक फटका हा देशातील महाराष्ट्र राज्याला बसला आहे. पण महाराष्ट्रात अद्याप समूह संसर्ग झालेला नसल्याचंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रातल्या मुंबईतही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं होतं. मे महिन्यातील शेवटच्या नऊ दिवसांच्या तुलनेत जूनमध्ये मृत्यूचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे.

जून महिन्यात मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत ४८१ मृत्यू झाले आहेत. एक जून रोजी ४० त्यानंतर पुढचे तीन दिवस ४९ मृत्यू झाले. पाच जूनला ५४ सहा जूनला ५८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

मंगळवारी करोनामुळे ५८ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात एकूण ७,७४५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या ९० हजारपर्यंत पोहोचली आहे. चीनच्या वुहानला महाराष्ट्राने मागे टाकले आहे.