भिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच घरात 'हे' उपाय करा, टेन्शन कायमचं होईल दूर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 05:04 PM2022-06-09T17:04:28+5:302022-06-09T17:18:02+5:30

उन्हानं अंगाची लाहीलाही होत असताना सर्वजण आता आतुरतेनं पावसाची वाट पाहात आहेत. पण पावसाळा म्हटलं की अनेक समस्या देखील निर्माण होतात. त्यापैकीच एक समस्या म्हणजे घराच्या भिंती ओल्या होणं. यावर नेमका काय उपाय करता येतात ते जाणून घेऊयात...

पावसाळा म्हटलं की जितका सुखद गारवा अनुभवयाला मिळतो तितक्याच समस्यांना देखील सामोरं जावं लागतं. पण पावसाळ्याची पूर्वतयारी तुम्ही करुन ठेवली की अनेक अडचणी दूर होतात किंवा त्रास कमी होतो. पावसाळ्यात अशीच एक हमखास निर्माण होणारी समस्या म्हणजे भिंतींना ओल येणं.

पावसाचं पाणी घराच्या भिंतींमध्ये झिरपलं की भिंतींना ओल पकडते आणि तुम्ही भिंतीला दिलेल्या रंगाची पूर्ण वाट लागते. रंगाचे आणि प्लास्टरचे पोपडे पडण्यास सुरुवात होते. पण भिंतींना ओल पकडल्यामुळे फक्त त्या खराब होतात असं नाही तर त्यात किड निर्माण झाली की आणखी मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं.

तुमच्याही घरच्या भिंतींना जर पावसाळ्यात ओल धरत असेल तर त्याकडे वेळेआधीच लक्ष देणं खूप गरजेचं आहे. घर मूळात भिंतींनी बनतं आणि तुमच्या घराच्या भिंतींची जर काळजी घेतली नाही तर कसं चालेल? आता पावसाळा जवळ आला आहे. त्यामुळे भिंतींना ओल पकडण्याच्या समस्येवर उपाय करण्याची हीच ती योग्य वेळ आहे.

भिंतींना ओल येण्यामागची कारणं आधी आपण जाणून घेऊयात. पावसाचं पाणी जर बाहेरुन सारखंच भिंतींवर पडत राहीलं तर भिंती ओल्या होतात. कधी कधी घराच्या छतांवर पाणी साचतं आणि ते भिंतींमध्ये झिरपून भिंती ओलसर होतात. यामुळे भिंती आणि दरवाजांनाही तडे जातात.

जमिनीतील आर्द्रता वरच्या भागात येते आणि त्यामुळे भिंती खराब होतात. कधी कधी तर घरातील ड्रेनेज पाईप ब्लाकमुळेही भिंती ओल्या होतात आणि त्या खराब होण्यास सुरुवात होते.

ज्या ज्या ठिकाणी पाणी साचतं किंवा ज्या भिंती खराब झाल्या आहेत. त्या व्यवस्थित साफ सफाई करुन त्यावर नवं प्लास्टर करुन घेणं कधीही चांगलं. कधी कधी भिंतीला बाहेरुन लावण्यात आलेला रंग वॉटरप्रूफ नसतो त्यामुळे पाणी भिंतीत झिरपतं. त्यामुळे नवं प्लास्टर करुन घेणं हा जालीम उपाय ठरू शकेल. घराच्या बाहेरील भिंतींनी वॉटरप्रूफ कोटिंग करुन घेणं कधीही चांगलं. यामुळे भिंती पाण्यापासून सुरक्षित राहतात.

ज्या ठिकाणी प्लास्टर पाण्यामुळे फुगलेलं दिसत असेल ते तातडीनं काढून टाका आणि नवं प्लास्टर करा. तसंच त्यावर वॉटर प्रूफ कोटिंग करू घ्या. बाजारात सिमेंटमिश्रीत वॉटर प्रोटेक्शन केमिकल सहज उपलब्ध होतात. याचा वापर करुन तुम्ही ओलसर भिंतीची समस्या सोडवू शकता.

भिंतींना पडलेल्या चिरा सिमेंटनं भरुन घ्या. जेणेकरुन भिंतीत पाणी झिरपणार नाही. तुमच्या घराच्या भिंतींना जर चिरा पडलेल्या असतील तर भिंतीत आर्द्रता पकडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे चिरांजवळील जागा ओली होते आणि भिंत खराब होण्यास सुरुवात होते. पावसाळा सुरू होण्याआधीच जर तुम्ही यावर काम केलं तर ते सुकायला तितकाच वेळ मिळतो आणि व्यवस्थित डागडुजी होते.

घरातील पाइपिंगमध्ये गळती लागली असेल म्हणजेत घरात पाणी पुरवठा करणारा किंवा ड्रेनेजचा एखाद्या पाईपला गळती लागली असेल तर भिंती ओल्या होतात. त्यामुळे घरातील पाइपिंगची व्यवस्था तपासून घ्या आणि काही त्रुटी असतील तर त्या दुरूस्त कराव्यात. तसंच छतावर पडणारं पावसाचं पाणी वाहून नेणारे पाईप देखील एकदा पावसाळ्याआधी तपासून पाहावेत. उन्हाळ्यामुळे प्लास्टिक पाईपना तडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे भिंतींचं नुकसान होतं.

टॅग्स :पाऊसRain