CoronaVirus News : चिंता वाढली! देशात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 504 दिवसांवरून 202 वर; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 08:33 AM2021-03-24T08:33:08+5:302021-03-24T08:55:57+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल एक कोटीवर गेली आहे. तर दीड लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान देशातील परिस्थिती ही चिंताजनक झाली आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा एकदा समोर आला आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी हा 504.4 दिवसांवरून 202.3 दिवसांवर आला आहे. 1 मार्चला हा कालावधी 504 दिवस होता तो आता 23 मार्चला तो 202 दिवस झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सहा राज्यांत दैनंदिन रुग्णांचे प्रमाण वाढले असून त्यांचे प्रमाण एकूण देशातील प्रमाणाच्या 80.90 टक्के आहे. 22 मार्चला 32.53 लाखांहून अधिक लोकांनी लसीचा डोस देण्यात आला आहे. एकाच दिवसातील ही सर्वांत मोठी संख्या आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सहा राज्यांत दैनंदिन रुग्णांचे प्रमाण वाढले असून त्यांचे प्रमाण एकूण देशातील प्रमाणाच्या 80.90 टक्के आहे. 22 मार्चला 32.53 लाखांहून अधिक लोकांनी लसीचा डोस देण्यात आला आहे. एकाच दिवसातील ही सर्वांत मोठी संख्या आहे.

महाराष्ट्रानंतर पंजाबमध्ये 2,299 रुग्ण असून गुजरातेत 1,640 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, छत्तीसगड, कर्नाटक , हरियाणा व राजस्थान या राज्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

फेब्रुवारीच्या मध्यावधीत भारतात नीचांकी रुग्ण संख्या होती. या पार्श्वभूमीवर कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्स 1 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत लागू होणार आहेत.

गृहमंत्रालयाने सांगितल्यानुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये देशाच्या सर्वच भागात टेस्ट, ट्रॅक आणि ट्रिट या प्रोटोकॉलची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी RTPCR चाचण्यांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी त्या तेजीनं वाढवण्यात याव्यात. जेणेकरून याचं ध्येय 70 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक निर्धारित करण्यात आलेल्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल, असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंटेन्मेंन्ट झोनच्या बाहेर अधिक बाबींना परवानगी देण्यात येईल. यामध्ये प्रवासी ट्रेन, हवाई वाहतूक, मेट्रो ट्रेन, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, रेस्तराँ, मॉल्स, मल्टीप्लेक्स, एन्टरटेन्मेंट पार्क, योगा सेंटर्स आणि एक्झिबिशन सुरू राहणार असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

ज्यावेळी कोरोनाच्या नव्या केसबद्दल माहिती मिळेल त्याच वेळी त्याच्यावर उपचार झाले पाहिजे. याशिवाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातूनही संपर्कात आलेल्या लोकांना आयसोलेट करण्यात यावं. झोनची माहिती जिल्हाधिकारी वेबसाईटवर टाकतील आणि ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाही देतील, असं यात नमूद करण्यात आलं आहे.

कामाच्या ठिकाणी तसंच गर्दीच्या ठिकाण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या सर्व उपाययोजना असायला हव्या. याशिवाय टेस्ट, ट्रॅक आणि ट्रिट या प्रोटोकॉलचं पालनही महत्त्वाचं असल्याचं गृह सचिव अजय भल्ला यांनी नमूद केलं.

कोणतीही सहव्याधी नसलेल्या 45 वर्षे वयावरील सर्व व्यक्तींना 1 एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लस घेता येऊ शकणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी सांगितले.

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पात्र ठरणाऱ्या सर्वांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जावडेकर यांनी यावेळी केले. ज्या राज्यांमध्ये बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे त्या राज्य प्रमुखांशी केंद्र सरकार संपर्क साधून आहे. या राज्यांना सर्व प्रकारचे सहाय्य केले जात असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने 16 जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत देशभरातील 5 कोटी 17 लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली.

देशात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरेसा साठा असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे ते म्हणाले. दोन्ही लसींची परिणामकारकता उत्तम असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.