Corona Vaccine : धक्कादायक! लसीचा तुटवडा असताना 'या' राज्यात कोरोना लसीचे 2500 डोस कचऱ्यात; रिपोर्टमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 09:33 AM2021-06-01T09:33:53+5:302021-06-01T09:48:43+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोना लसींचा तुटवडा असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला असून तीन लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये लसींची पुरेशी उपलब्धता नाही. तर काही राज्यांमधील अनेक लसीकरण केंद्र बंद आहेत.

देशात कोरोना लसींचा तुटवडा असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानमधील 8 जिल्ह्यातील 35 लसीकरण केंद्रांवर लसीच्या 500 व्हायल्स कचऱ्याच्या डब्यात आढळून आल्या आहेत. या 500 व्हायल्समध्ये जवळपास 2 हजार 500 हून अधिक डोस होते.

कोरोना लसीसंदर्भात रिपोर्टमधून हा मोठा खुलासा करण्यात आला आहे. लसीकरण केंद्रांवरील कचऱ्याच्या डब्यांमध्ये आढळून आलेल्या 500 व्हायल्स या 20 ते 75 टक्के भरलेल्या आढळून आल्या. दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

राजस्थानमध्ये 16 जानेवारी ते 17 मे पर्यंत 11.50 लाखांहून अधिक कोरोनावरील डोस खराब झाल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. लसीचे डोस वाया जाण्याच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारचे आकडे वेगवेगळे आहेत.

राज्यात कोरोना लसीचे वाया जाण्याचे प्रमाण हे फक्त 2 टक्के आहे, असा राजस्थान सरकारचा दावा आहे. तर एप्रिलमध्ये 7 टक्के आणि 26 मे महिन्यात 3 टक्के लसींचे डोस फेकण्यात गेल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

ज्या लसीकरण केंद्रावर तपासणी करण्यात आली तिथे 25 टक्के लसींचा अपव्यय समोर आला. हे प्रकरण समोर आल्यानंतर राजस्थानच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव अखिल अरोरा यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

केरळला कोरोनावरील लसींचे जेवढे व्हायल्स मिळाले त्यातून 87 हजारांहून अधिक नागरिकांना डोस दिले गेले. राजस्थानमध्येही आरोग्य केंद्र हिंडोलीतील एका शाळेतील लसीकरण शिबिरात लसीचा एकही डोस वाया गेला नाही.

आरोग्य कर्मचारी गायत्री शर्मा यांना 27 मे रोजी 22 व्हायल्स मिळाल्या. यामुळे 240 नागरिकांना डोस दिला गेला. बुंदीच्या बालचंद पाडा केंद्रावरील आरोग्य कर्मचारी महिमा वर्मा, अयोध्या शर्मा आणि अफरोज यांनी 25 व्हायल्सद्वारे नागरिकांना बोलावून 274 जणांना डोस दिला.

कोरोनाविरोधातील लढ्यात सध्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. या महाभयंकर संकटात जून महिना काहीसा दिलासा देणारा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.

तज्ज्ञांना जून महिन्यात कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ तर नवीन रुग्ण आणि मृत्यूच्या दरात घट होण्याची अपेक्षा आहे. तसेच जून महिन्यात देशाला 12 कोटींहून अधिक लसी उपलब्ध होऊन लसीकरणाचा वेगही वाढेल, असंही मानलं जात आहे.

जून महिन्यात भारतात कोरोनाविरोधातील लढ्यात महत्त्वाच्या असलेल्या लसींचे तब्बल 12 कोटी नवे डोस उपलब्ध होतील. यातील जवळपास 6.09 कोटी डोस हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि लगभग 45 वर्षांवरील लोकांसाठी केंद्र सरकारकडून मोफत उपलब्ध करुन दिले जातील.

5.86 कोटीहून अधिक डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांशिवाय खासगी रुग्णालय थेट विकत घेऊ शकतात. भारतात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

9 मे रोजी देशात कोरोनाचे नवे 403738 रुग्ण आढळले होते. तर, 30 मेपर्यंत हा आकडा 165553 वर आला आहे. आयआयटी कानपूर आणि हैदराबादमधील शास्त्रज्ञांनी जूनमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

जून महिन्याच्या शेवटपर्यंत देशभरात कोरोनाचे दररोज 20 हजार नवे रुग्ण आढळतील. तर, जुलै महिन्यापर्यंत दुसरी लाट जवळपास पूर्णपणे ओसरेल त्यांचा असा दावा आहे. सध्या कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे.