मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 09:32 PM2024-05-19T21:32:30+5:302024-05-19T21:32:56+5:30

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून वाहतुकीबाबत एक अधिसूचना काढण्यात आली आहे.

Important decision of Navi Mumbai Police Commissionerate regarding traffic before voting | मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

Lok Sabha Election ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार आहे. राज्यात उद्या १३ जागांवर मतदान होणार असून प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. अशातच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून वाहतुकीबाबत एक अधिसूचना काढण्यात आली असून सर्व प्रकारच्या अवजड, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २० मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील, असं या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे अशा वाहनांनी उद्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या दिशेने प्रवास करू नये, अशाही सूचना पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आल्या आहेत.

उद्या किती जागांसाठी मतदान?

महाराष्ट्रात धडाडत असलेल्या प्रचारतोफा दीड महिन्यानंतर शांत झाल्या. राज्यातील एकूण पाचव्या टप्प्यांपैकी शेवटच्या टप्प्यात १३ मतदारसंघांसह देशातील ८ राज्यांतील ४९ जागांसाठी सोमवारी (दि. २०) मतदान होणार आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा असल्याने व त्यातही बहुतांश मतदारसंघ मुंबईतील असल्याने राज्यासह देशातील प्रमुख नेत्यांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा उडविला होता. 

मतदानाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वाचा निर्णय

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने राज्यात तसेच राज्याच्या सीमेलगतच्या निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना जरी ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. मतदानाच्या दिवशी कार्यरत कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने, दुकाने इत्यादींना बंधनकारक आहे. खाजगी कंपन्यांमधील आस्थापना सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स यांमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी कामगार अधिकारी-कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी संस्थेतील अधिकारी- कर्मचारी मतदान करण्यापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन मतदानासाठी दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे निर्देशही यादव यांनी दिले आहेत.
 

Web Title: Important decision of Navi Mumbai Police Commissionerate regarding traffic before voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.