Maharashtra Political Crisis: शरद पवारांच्या बारामतीसाठी BJPचा मेगा प्लान! ‘मिशन लोकसभा’ ऑन; गल्ली ते दिल्ली नेत्यांची फौज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 02:13 PM2022-08-29T14:13:08+5:302022-08-29T14:17:19+5:30

Maharashtra Political Crisis: भाजपने शिंदे गटासह राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीतत केले असले तरी बारामतीवर खास लक्ष दिले आहे.

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासाठी भाजपने मिशन ४८ हाती घेतले असून, यंदा बारामतीवर अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे पाहायला मिळत आहे. अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे नेते बारामती तळ ठोकणार असून, शरद पवारांना तगडी फाइट देण्यासाठी भाजपने मोठी रणनीति आखल्याचे बोलले जात आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या सर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी करण्यासाठी बावनकुळे यांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी बुथ लेव्हलपासून भाजपची बांधणी सुरू झाली आहे.

एवढेच नव्हे तर काही केंद्रीय मंत्रीही महाराष्ट्रात दौरे करून संघटन बांधणीला बळ देणार आहेत. सप्टेंबरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघांवर लक्ष केंद्रीतत केले असले तरी बारामतीवर खास लक्ष दिले आहे.

महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघात ९ केंद्रीय मंत्री ६ वेळा प्रवास करणार आहेत. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आम्ही ४८ मतदारसंघात काम करत आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री निर्मला सितारामण यांचा दौरा आहे. मी सुद्धा बारामती मतदारसंघात संघटन बांधणीचा दौरा करणार आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

जयंत पाटील यांनी सत्तेत असल्याच्या मानसिकतेतून बाहेर यावे, काही दिवस आराम करावा. आता महाविकास आघाडीत धुसफूस आहे. ते जयंत पाटील यांनी पाहावे. राष्ट्रवादीत काय चाललेय? याबाबत जयंत पाटील यांनी लक्ष द्यावे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मोडीत काढण्यासाठी भाजपने दंड थोपटले आहे. भाजपच्या विरोधात देशपातळीवर मोट बांधण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका महत्वाची ठरते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत आतापासुन बारामतीत भाजप नेत्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.

यंदा प्रथमच खुद्द केंद्रीय मंत्री ३ दिवस मुक्काम करुन मतदारसंघात थांबणार आहेत. निवडणुक व्यूहरचना आखण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांच्या सहभागातून आखण्यात येणारी रणनीती औत्सुक्याची ठरणार आहे. विधानपरिषद आमदार राम शिंदे यांनी लोकसभा प्रभारीपदी निवड करुन त्यांच्या मतदारसंघाची महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करण्याचे संकेत भाजपने दिल्याचे मानले जाते. २०१९ मध्येच लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सूचना केल्याची चर्चा होती. बारामतीत भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांसह मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या. मात्र, बारामतीकरांनी भाजप उमेदवाराला नाकारले. त्यामुळे भाजप नेत्यांचे लोकसभा मतदारसंघावर विजय मिळविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले होते.

मात्र, यावेळी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले असून, त्यांना शिंदे गटाचीही साथ मिळू शकले, असे सांगितले जात आहे. यामुळे भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.