तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 06:00 AM2024-05-18T06:00:57+5:302024-05-18T06:03:24+5:30

मी जाईन तेव्हा विकसित भारत तुमच्या हाती सोपवूनच जाईन, मी प्रत्येक क्षण देशासाठी जगत आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कवरील महायुतीच्या भव्य सभेत काढले.

pm modi criticized india alliance in shivaji park rally for lok sabha election 2024 | तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी

तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या विरोधकांना जे अशक्य वाटत होते, ते मी करून दाखविले. राममंदिर झाले, ३७० कलमही हटले. देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला. लवकरच तो तिसऱ्या क्रमांकावर असेल. मी जाईन तेव्हा विकसित भारत तुमच्या हाती सोपवूनच जाईन, मी प्रत्येक क्षण देशासाठी जगत आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शिवाजी पार्कवरील महायुतीच्या भव्य सभेत काढले. अतिरेक्यांच्या हल्ल्यांनी रक्ताळलेली मुंबई सुरक्षित केली, देशाच्या आर्थिक राजधानीला मी धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. ‘जय भवानी, जय शिवाजी. समस्त मुंबईकरांना माझा रामराम. कसे आहात तुम्ही...’, पंतप्रधान मोदींनी अशी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. अडतीस मिनिटांच्या भाषणात मोदींनी उद्धव ठाकरे, काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. यावेळी हजारोंच्या गर्दीने ‘मोदी, मोदी’चा घोष करत प्रतिसाद दिला.

स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व व्यवस्थांच्या काँग्रेसीकरणामुळे पाच दशके बरबाद झाली. भारतासोबतच स्वतंत्र झालेले कितीतरी देश आपल्यापुढे निघून गेले. आपल्यात कमतरता होती का तर नाही, कमतरता त्या सरकारांमध्ये होती ज्यांनी भारतीयांवर विश्वास ठेवला नाही. माझ्याजवळ दहा वर्षांचे प्रगतिपुस्तक आहेच; पण पंचवीस वर्षांचा रोडमॅपही आहे. पण इंडीवाल्यांकडे काय आहे. जितके पक्ष, तितके पंतप्रधानपदाचे उमेदवार, असा टोलाही त्यांनी लगावला. 

या स्वप्न नगरीत मी २०४७च्या स्वप्नाला घेऊन आलो आहे. आपण सगळ्यांनी मिळून विकसित भारत घडवायचा आहे. त्यात मुंबईची मोठी भूमिका असणार आहे, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. 

आपला जीव गेला तरी सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही. उबाठा यांच्याकडे शिव्यासेना आहे, आमच्याकडे खरी शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडणाऱ्यांना साथ देऊ नका. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

मुंबईवर कसाबने हल्ला केला आणि काँग्रेसवाले हेमंत करकरे कसाबच्या गोळीने शहीद झाले नाहीत असे म्हणत आहेत. शहिदांचा ते अपमान करत आहेत. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बलिदानाचा अपमान करणारी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री .

पंतप्रधान मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मुंबईकरांंचा प्रवास सुखाचा करा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून द्या. - राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे.

 

Web Title: pm modi criticized india alliance in shivaji park rally for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.