...म्हणून त्याने ऑर्केस्ट्रा आणला, डान्सर नाचवल्या आणि वाजतगाजत काढली वडलांची अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 12:35 PM2021-08-11T12:35:13+5:302021-08-11T12:44:48+5:30

Jara Hatke News:

मृत्यू हा दु:खदायी असतो. त्यामुळे सहसा अंत्ययात्रेवेळी गंभीर वातावरण असते. मात्र बिहारमधील सारण जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या वडिलांची वाजत गाजत अंत्ययात्रा काढली. १०४ वर्षांच्या या वृद्ध वडलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना अविस्मरणीय निरोप द्यावा, म्हणून ऑर्केस्ट्रा ठेवून, डान्सर नाचवून कुटुंबीयांनी त्यांना निरोप दिला. आता या अंत्ययात्रेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सर्वसाधारणपणे जेव्हा कुणाचाही मृत्यू होतो तेव्हा घरात शोकाचे वातावरण असते. मात्र येथे कुटुंबातील लोक रडण्याऐवजी डान्सरसोबत नाच करत होते. या ज्येष्ठ नागरिकाच्या अंत्ययात्रेत कुटुंबीय भोजपुरी गाण्यावर नाचून अंत्ययात्रेतील गंभीर वातावरणाला आनंददायी वातावरणात बदलत होते.

१०४ वर्षीय भोला यादव यांचा रविवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या मुलाने आणि कुटुंबीयांनी वाजतगाजत त्यांची अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेचा व्हिडीओ बनवून कुणीतरी तो व्हायरल केला. त्यानंतर लोक वेगवेगळ्या कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर भोजपुरी गाण्यावर डान्सर डान्स करत असल्याचे दिसत आहे. तर खाली मृतदेहाला खांदा देणारे लोकही त्यांच्यासोबत नाचत असल्याचे दिसत आहे. ही अंत्ययात्रा साधपूर येथून निघून डुमाईगड स्मशानभूमीत पोहोचली. या अंत्ययात्रेत शेकडो लोक सहभागी झाले होते.

भोजपुरी गाण्यांवर नाचत असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे दु:ख दिसत नव्हते. कुटुंबीय शेजारीपाजारी हसत खेळत या वृद्धाला निरोप देत होते.

तर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील १०४ वर्षीय वृद्धाचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांची अंत्ययात्रा अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही असे केले. मृत भोला यादव आपल्यामागे चार मुलांसह नातवडे, पतवंडे असं मोठं कुटुंब सोडून गेले आहेत.