अंतराळात आहे मौल्यवान धातूंची खाण, लवकरच NASA चे यान पाहणी करण्यासाठी जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 06:06 PM2021-10-06T18:06:34+5:302021-10-07T12:20:06+5:30

Psyche Mission: ऑप्टिकल टेलिस्कोप आणि शक्तिशाली रडारद्वारे या अॅस्टेरॉइडचा शोध लागला आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेतील अंतराळ संस्था NASA एक मोठं अंतराळयान तयार करत आहे. हे यान '16 सायकी'(16 Psyche) नावाच्या अॅस्टेरॉइडवर जाणार आहे. एका रिपोर्टनुसार, या अॅस्टेरॉइडवर मौल्यवान धातूंचा खूप मोठा साठा आहे.

नासाच्या अंतराळ यानाची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पेसएक्सच्या फाल्कन हेवी रॉकेटच्या मदतीने पुढील वर्षी ऑगस्टमध्ये फ्लोरिडामधील केप कॅनावेरलमधून हे यान प्रक्षेपित केले जाईल. याला 'सायकी मिशन'(Psyche Mission) असे नाव देण्यात आलं आहे.

पृथ्वीवरील ऑप्टिकल टेलिस्कोप आणि शक्तिशाली रडारद्वारे या 16 सायकी अॅस्टेरॉइडचा शोध लागला आहे. या 16 सायकी अॅस्टेरॉइडवर मौल्यवान धातुंचा इतका मोठा साठा आहे की, पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश बनू शकेल. अशा प्रकारची बातमी काही दिवसांपूर्वी खूप व्हायरल झाली होती.

हा अनोखा लघुग्रह मंगळ आणि बुधदरम्यान असलेल्या लघुग्रहांच्या पट्ट्यामध्ये आहे. ग्रीक पौराणिक कथांमध्ये, 'सायकी' एका देवीचे नाव आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हा साइकी अॅस्टेरॉइड सूर्यमालेच्या उत्पत्तीशी संबंधित असू शकतो.

नासाचे अंतराळ यान 'सायकि मिशन'अंतर्गत धातूंनी युक्त या अॅस्टेरइडकडे जाऊन येतील. या अॅस्टेरॉइडची रचना 'सायकि मिशन'अंतर्गत तपासली जाईल आणि या लघुग्रहाचा नकाशा तयार करुन त्याचा अभ्यास केला जाईल.

दक्षिण-पश्चिम संशोधन संस्थेच्या सायकि मिशनशी संबंधित शास्त्रज्ञ बिल बोटेक म्हणाले की, या शोधाच्या निकालांद्वारे आपण सौर यंत्रणा कशी तयार झाली आणि ती कशी विकसित झाली हे शोधू शकतो.

सायकी लघुग्रहावर आयर्न ऑक्साईडची कमतरता असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले आहे. एरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या लिंडी एल्किन्स-टँटनच्या मते, सायकीच्या रचनेबद्दल शास्त्रज्ञांचे अंदाज बरोबर असतील तर त्याच्या निर्मितीबद्दल एक आश्चर्यकारक माहिती समोर येऊ शकते.

नासाच्या अंतराळ यानामध्ये सायकी लघुग्रहाचे रहस्य समजून घेण्यासाठी आणि उघड करण्यासाठी सर्व आवश्यक उपकरणे असतील. सायकी मिशनशी निगडित जिम बेल म्हणाले की, आपण काय बघणार आहोत हे कोणालाही ठाऊक नाही, परंतु असे वाटते की सायकीची वास्तविकता आपल्या कल्पनेपेक्षा अधिक आश्चर्यकारक आणि सुंदर असेल.