तालिबानचा अजब फतवा, PhD होल्डरला हटवून BA पास व्यक्तीला बनवलं विद्यापीठाचा VC, ७० जणांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 12:12 PM2021-09-23T12:12:17+5:302021-09-23T12:21:17+5:30

Kabul University VC : विद्यापीठातील ७० कर्मचाऱ्यांचे राजीनामे. लोकांमध्येही संतापाचं वातावरण.

तालिबानने काबुल विद्यापीठाचे कुलगुरू मोहम्मद उस्मान बाबूरी यांना हटवल्यानंतर प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापकांसह जवळपास ७० शिक्षण कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

गैरेत याच्या नियुक्तीपासून त्याविरोधात आवाज उठवला जात आहे आणि तालिबानच्या या आदेशावरून सोशल मीडियावर टीकाही होत आहे.

तालिबानने बुधवारी पीएचडी केलेल्या बाबूरीच्या जागी कुलगुरू म्हणून मोहम्मद अशरफ गैरत याची नियुक्ती केली, ज्यांच्याकडे फक्त बीएची पदवी होती.

अनेक लोकांनी गेल्या वर्षी गैरतचे काही ट्वीटही शेअर करायला सुरुवात केली होती, ज्यात पत्रकारांच्या हत्येला त्याला जबाबदार धरण्यात आलं होतं.

अफगाणिस्तानच्या पहिल्या विद्यापीठात, पीएचडी धारक काढून टाकल्यानंतर आणि बीए पदवी असलेल्या व्यक्तीला व्हीसी बनवल्यानंतर लोकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

गैरतपेक्षाही अनेक जण या पदासाठी पात्र असल्याची प्रतिक्रिया तालिबानच्या काही लोकांसह अनेकांचं म्हणणं असल्याची प्रतिक्रिया खामा प्रेस या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

मागील सरकारमध्ये गैरत शिक्षण मंत्रालयात कार्यरत होता. सोमवारी तालिबानने अधिकृतपणे अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष आणि देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे संस्थापक बुरहानुद्दीन रब्बानी यांच्या नावावर असलेल्या विद्यापीठाचे नाव काबूल एज्युकेशन युनिव्हर्सिटी असं ठेवलं.

बुरहानुद्दीन रब्बानी यांचा २००९ मध्ये एका हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर या विद्यापीठाचं नाव बदलून त्यांचं नाव देण्यात आलं होतं.

Read in English