Russia vs Ukraine War: पुतीन फ्लॉवर समजले; 'ते' फायर निघाले! रशियाची जय्यत तयारी; पण 'ती' ५ मिनिटं पडली भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 07:53 PM2022-02-28T19:53:57+5:302022-02-28T19:59:54+5:30

Russia vs Ukraine War: युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी भल्याभल्यांचे अंदाज चुकवले; पुतीन यांच्या तयारीवर झेलेन्स्की यांची हिंमत, धैर्य भारी

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की. गेल्या महिन्यापर्यंत त्यांचं नाव कोणाला माहीतही नव्हतं. मात्र गेल्या आठवड्याभरापासून जगभरात त्यांच्या नावाची चर्चा आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेन किती काळ तग धरेल, असा प्रश्न जगाला पडला होता. त्याचं उत्तर झेलेन्स्की यांनी स्वत:च्या कृतीतून दिलं.

रशियन सैन्य युक्रेनमध्ये शिरताच जोरदार हल्ले झाले. युक्रेनी सैन्य मुकाबला करण्यात कमी पडू लागले. तेव्हा झेलेन्स्की स्वत: रस्त्यावर उतरले. त्यांचे फोटो व्हायरल झाले. जगभरात रशियाविरोधात वातावरण तयार करण्यात झेलेन्स्की यांचा वाटा मोठा आहे.

युरोपियन युनियनचे बडे नेते गेल्या गुरुवारी ब्रसेल्समध्ये आपत्कालीन बैठकीसाठी भेटले. रशियावर नवे निर्बंध लादण्याचा निर्णय याच बैठकीत झाला. यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, परराष्ट्र मंत्री सर्जेई लावरोव यांच्याविरोधात निर्बंधांची घोषणा झाली. रशियाच्या बड्या बँकांवर निर्बंध आले.

युरोपियन युनियननं लादलेल्या निर्बंधांनंतर रशियासाठी युक्रेन युद्ध सोपं राहिलं नाही. युनियनच्या बैठकीला झेलेन्स्की यांची ऑनलाईन उपस्थित होती. त्यावेळी ते अतिशय भावुक दिसले. आपण युरोपियन युनियनच्या आदर्शवादामुळे संपत आहोत, असं झेलेन्स्की म्हणाले. झेलेन्स्की यांनी केलेल्या आवाहनाचा युनियनच्या नेत्यांवर खूप मोठा परिणाम झाला.

'झेलेन्स्की ५ मिनिटं बोलत होतं. तुमच्या आमच्या प्रामाणिकपणाचं मूल्यांकन करा. रशियाविरुद्धच्या लढाईत आमची मदत करा,' असं आवाहन झेलेन्स्की यांनी केलं. कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पाहत आहात, या झेलेन्स्की यांच्या उद्गारांचा खूप मोठा परिणाम झाला.

झेलेन्स्की यांनी युक्रेनची बाजू सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर मांडली. २६ फेब्रुवारीला त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात ते राजधानी कीवच्या रस्त्यांवर दिसले. मी देश सोडून गेल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. पण मी इथे रस्त्यावर आहे, असं झेलेन्स्की यांनी म्हटलं.

रशियाच्या फौजा युक्रेनमध्ये शिरताच झेलेन्स्की देशाबाहेर पळून जातील, असा पुतीन यांचा अंदाज होता. तालिबानचं आक्रमण सुरू असताना अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडून पळ काढला होता. पण झेलेन्स्की कीवमध्येच ठाण मांडून बसले. वेळोवेळी त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला.

झेलेन्स्की यांच्या सुरक्षेचा विचार करून अमेरिकेनं त्यांना युक्रेन सोडण्यासाठी विमान देऊ केलं. त्यावर आम्ही युद्ध लढतोय. विमानं नको, शस्त्रं द्या, असं उत्तर झेलेन्स्की यांनी दिलं. झेलेन्स्की यांनी देशवासीयांना केलेलं भाषण तर कित्येक भाषांमध्ये वाचायला मिळतंय. विविध भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला.

झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनला संबोधित केल्यानंतर अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले. महत्त्वाच्या घोषणा झाल्या. जर्मनी, नेदरलँडनं युक्रेनला लष्करी मदत केली. याचा परिणाम युक्रेनमध्ये दिसून आला. बलाढ्य रशियासमोर युक्रेन आजही लढतोय.