आता खार आणि उंदरांच्या माध्यमातून पसरतेय जीवघेणी साथ, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 08:44 AM2020-09-09T08:44:50+5:302020-09-09T08:58:24+5:30

कोरोनाची साथ नियंत्रणात आली नसतानाच आता खार आणि उंदरांच्या माध्यमातून पसरत असलेल्या एका जीवघेण्या साथीबाबतची माहिती समोर आली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या साथीमुळे संपूर्ण जग हतबल झाले आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात आली नसतानाच आता खार आणि उंदरांच्या माध्यमातून पसरत असलेल्या एका जीवघेण्या साथीबाबतची माहिती समोर आली आहे. या साथीमुळे मंगोलियामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

चिंतेची बाब म्हणजे या साथीमुळे यापूर्वीही जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झालेला आहे. या साथीचा जगावर तीनवेळा हल्ला झाला होता. यामध्ये पहिल्यांदा पाच कोटी, दुसऱ्यांदा युरोपमधील एक तृतियांश लोकसंख्या आणि तिसऱ्यांदा ८० हजार लोकांचा बळी घेतला होता. आता पुन्हा एकदा हा आजार मंगोलिया, चीन आणि आजूबाजूच्या देशात पसरत आहे.

या आजाराचे नाव ब्लुबोनिक प्लेग असून, या आजारामुळे मंगोलियातील खोव्सगोल प्रांतात एका ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. तीव्र ताप आल्यानंतर या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र श्वास घेण्यास होत असलेला त्रास आणि कार्डियोवस्कुलरच्या समस्येमुळे त्याचा मृत्यू झाला. हा आजार खार आणि उंदरांच्या माध्यमातून पसरत असल्याचे समोर आले आहे.

त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २५ जणांची तपासणी करण्यात आली. मात्र त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संसर्ग झाल्याचे दिसून आले नाही. दरम्यान, मंगोलियामध्ये या साथीमुळे आधीही दोन जणांचा मृत्यू झाला होता.

नॅशनस सेंटर फॉर कम्युनिकेबल डिजिसेसच्या म्हणण्यानुसार मंगोलियातील २१ प्रांतांपैकी १७ प्रांतांमध्ये ब्युबोनिक प्लेगच्या संसर्गाचा धोका आहे. ब्युबोनिक प्लेगचे यावर्षी एकूण २१ संशयित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, रशियाने मंगोलिया आणि चीनमध्ये पसरत असलेल्या ब्युबोनिक प्लेगच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सीमेलगतच्या भागातील हजारो लोकांचे लसीकरण केले आहे.

ब्युबोनिक प्लेग हा रानटी उंदीर आणि खारींमध्ये असलेल्या जिवाणूपासून पसरतो. या जिवाणूचे नाव यर्सिनिया पेस्टिस बॅक्टेरिमय असे आहे. हा जिवाणू शरीरातील लिम्फ नोड्स, रक्त आणि फुप्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे बोटे काळी पडून सडू लागतात.

ब्युबोनिक प्लेगमुळे शरीरात असह्य वेदना आणि तीव्र ताप येतो. नाडी वेगाने चालू लागते. शरीरावर फोड येऊ लागतात. त्यानंतर होणाऱ्या वेदना ह्या तीव्र असतात. २०१० ते २०१५ या काळात ब्युबोनिक प्लेगचे सुमारे ३ हजार २४८ रुग्ण सापडले होते. यापैकी ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

ब्युबोनिक प्लेगलाच सहाव्या आणि आठव्या शतकामध्ये प्लेग ऑफ जस्टिनियनचे नाव देण्यात आले होते. या साथीमुळे तेव्हा जगभरात तब्बल अडीच ते पाच कोटी लोकांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर ब्युबोनिक प्लेगचा दुसरा हल्ला १३४७ मध्ये झाला होता. त्यावेळी त्याचे नामकरण ब्लॅक डेथ असे करण्यात आले होते. या साथीमुळे युरोपमधील तेव्हाची एक तृतियांश लोकसंख्या मृत्युमुखी पडली होती. त्यानंतर १८९४ च्या आसपास तिसऱ्यांदा ही साथ पसरली तेव्हा ८० हजार लोकांचा मृत्यू झाल होता. भारतात १९९४ मध्ये पाच राज्यांमध्ये ब्युबोनिक प्लेगचे सुमारे ७०० रुग्ण सापडले होते. त्यापैकी ५२ जणांचा मृत्यू झाला होता.