Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 05:59 IST2026-05-11T05:57:32+5:302026-05-11T05:59:00+5:30
Iran War Latest News: अबुधाबीहून येत असलेल्या एका व्यावसायिक जहाजाला दक्षिणेकडील बंदराजवळ ड्रोनने लक्ष्य केले.

प्रातिनिधिक छायाचित्र
दुबई : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेला युद्धविराम रविवारी पुन्हा एकदा संकटात सापडला. कतारच्या किनारपट्टीवर एका मालवाहू जहाजाला ड्रोनने लक्ष्य केले, तर कुवेतच्या हवाई हद्दीतही संशयास्पद ड्रोन शिरल्याने तणाव वाढला आहे.
कतारच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अबुधाबीहून येत असलेल्या एका व्यावसायिक जहाजाला दक्षिणेकडील बंदराजवळ ड्रोनने लक्ष्य केले. यामुळे जहाजाला आग लागली, मात्र ती तातडीने विझवण्यात आली. ब्रिटिश मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला दोहापासून ४३ किलोमीटरवर झाला.
इराणचा इशारा, हल्ल्याची तयारी
अणुतळ सुरक्षित ठेवण्यासाठी सैन्य सज्ज आहे. आमचे युरेनियम चोरण्याचा किंवा हेलिकॉप्टरद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शंका आहे, असे इराणचे ब्रिगेडियर जनरल अकरामिया निया यांनी सांगितले.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर त्यांच्या तेलवाहू जहाजांवर हल्ला झाला, तर ते या भागातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर भीषण हल्ला करतील.
कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रविवारी पहाटे काही शत्रुड्रोन त्यांच्या हवाई हद्दीत शिरले होते.