अहो आश्चर्यम्! वर्षभरानंतर अचानक सुरू झाली हृदयाची धडधड; देशात पहिल्यांदाच घडला चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 08:23 PM2021-10-05T20:23:31+5:302021-10-05T20:29:30+5:30

दैवी चमत्कार! वर्षभर बंद पडलेलं हृदय अचानक सुरू झालं

हृदय कमजोर असलेल्या व्यक्तीच्या शरीरातील कृत्रिम हृदय काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचा चमत्कार घडला आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कृत्रिम हृदय लावण्यात आलं आणि काही वर्षांमध्ये त्याचं स्वत:चंच हृदय उत्तमपणे काम करू लागावं आणि कृत्रिम हृदय काढण्याची वेळ यावी, असा प्रकार देशात पहिल्यांदा घडला आहे.

५१ वर्षांचा इराकी रुग्ण जवादनं आता त्याच्या मुलाचं नाव अजय कौल ठेवलं आहे. कारण जवाद डॉक्टर अजय कौल यांना आता देव मानतात. त्यांच्यामुळेच आपण वडील बनू शकलो, अशी जवाद यांची भावना आहे.

नोएडातील फोर्टिस रुग्णालयाच्या डॉक्टरांनी जवाद मोहम्मद यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली. कृत्रिम हृदय बाहेर काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते. अशा प्रकारची शस्त्रक्रिया दुर्मिळ मानली जाते.

रुग्णाचं निकामी झालेलं हृदय इतकं सक्षम होतं की ते स्वत:हून त्याचं काम करू लागतं आणि त्याला कोणत्याही आधाराची गरज भासत नाही, असं अगदी क्वचित घडतं. तीन वर्षांपूर्वी जवाद मोहम्मद फोर्टिस रुग्णालयात दाखल झाले. ते इराकहून भारतात आले होते.

जवाद यांचं हृदय निकामी झालं होतं. डॉक्टरांनी त्यांना हृदयस प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र कित्येक महिने प्रतीक्षा यादीत असूनही त्यांना दाता मिळाला नाही. हृदय प्रत्यारोपणासाठी कोणत्याही ब्रेन डेड व्यक्तीच्या हृदयाची गरज असते. सहा तासांत ही शस्त्रक्रिया करावी लागते.

हृदय प्रत्यारोपण शक्य नसल्यानं डॉक्टरांनी जुलै २०१८ मध्ये जवाद यांच्या शरीरात कृत्रिम हृदय बसवलं. २०१९ मध्ये जवाद तपासणीसाठी आले असताना त्यांचं हृदय काम करत असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यामुळे डॉक्टरांनी कृत्रिम हृदयाला होणारा वीज पुरवठा रोखला आणि तपासणी केली.

शरीरात लावण्यात आलेलं कृत्रिम हृदय बॅटरीवर चालतं. ती दररोज चार्ज करावी लागते. जवाद यांचं हृदय कसं काम करतंय, याची तपासणी २ वर्षे करण्यात आली. या कालावधीत त्यांचं हृदय उत्तमपणे काम करत होतं. त्यामुळे कृत्रिम हृदय काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

देशात आतापर्यंत १३० व्यक्तींच्या शरीरात कृत्रिम हृदय लावण्यात आली आहेत. मात्र रुग्णाच्या शरीरातील हृदय उत्तमपणे काम करू लागल्यानं कृत्रिम हृदय काढण्याची गरज आतापर्यंत एकदाही निर्माण झालेली नाही.

कृत्रिम हृदय लावण्यात आल्यानं नैसर्गिक हृदयावरील भार कमी झाला. त्यामुळे ते हळूहळू सक्रिय होऊ लागलं. सुरळीत काम करू लागलं. त्यामुळे कृत्रिम हृदयाची गरज संपली. जवाद यांनी कृत्रिम हृदय काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया काढून कृत्रिम हृदय काढलं.