“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 01:48 PM2024-05-21T13:48:55+5:302024-05-21T13:51:54+5:30

Pune Accident News: उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

cm eknath shinde give clear direction to pune police about pune porsche car accident | “कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश

“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश

Pune Accident News: पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील आरोपींना तातडीने जामीनही मिळाला त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. वेदांत अगरवाल असे आरोपीचे नाव असून, तो अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी फोनवर संपर्क साधला आणि कुणालाही पाठीशी घालू नका, असे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही, तरीदेखील वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली, तसेच मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करीत असल्याचेही वडिलांना माहिती आहे, असे अल्पवयीन आरोपीने पोलिसांना सांगितले. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना निर्देश दिले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांशी संवाद साधला.

कुणालाही पाठीशी घालू नका

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला. याप्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दुसरीकडे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. तसेच कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले. याशिवाय, या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. 

दरम्यान, या प्रकरणी ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विशाल अग्रवाल यांच्याखेरीज अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हाॅटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हाॅटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने मद्यपान करून कार चालवून झालेल्या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले. त्याचे संतप्त पडसाद शहरात उमटले.
 

Web Title: cm eknath shinde give clear direction to pune police about pune porsche car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.