Shraddha Walker Murder Case: आफताबचा जबाब अन् संपूर्ण यंत्रणा कामाला लागली; अख्खा तलाव रिकामा केला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 09:18 AM2022-11-22T09:18:36+5:302022-11-22T09:26:17+5:30

Shraddha Walker Murder Case: आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे.

आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान त्याने श्रद्धाचं शिर एका तलावात टाकल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. त्यानंतर पोलिसांनी छतरपूर जिल्ह्यात मैदान गढी तलावातील पाणी उपसणे सुरू केले होते. याशिवाय पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले होते, परंतु श्रद्धाचे शिर अद्याप सापडलेले नाही.

याचा तपास सीबीआयकडेहस्तांतरित करण्याचे निर्देश मागणारी जनहित याचिका सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाचे वसईत पडसाद उमटताना दिसत असून, आफताबच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देऊन नागरिकांनी चपलेने मारहाण केली.

दरम्यान, आफताब याने अतिशय शांत डोक्याने १८ मे रोजी श्रद्धा हिची हत्या केली होती. यानंतर ५ जून रोजी आफताबने वसईतील एव्हरशाइन येथील भाड्याच्या घरातील सामान दिल्लीत मागवले होते. मीरा रोड येथील एका कंपनीला हे काम दिले होते.

कंपनीच्या गोविंद यादव याची दिल्ली पोलिसांनी चौकशी करून त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्याने सामान शिफ्ट करताना झालेल्या व्यवहाराची पावती पोलिसांना दिली असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीला सामान शिफ्ट करण्यासाठी २० हजार रुपये आफताबने गुगल-पेद्वारे भरले होते. एक आठवड्यात आम्ही सामान दिल्लीला पाठवले, असे यादव याने पोलिसांना सांगितले.

आफताबने सुरुवातीला मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम केले होते. तेथील त्याची वर्तणूक कशी होती, याची चौकशी दिल्ली पोलिसांनी केली. ट्रेनी शेफ म्हणून तो कसा वागत होता, याबाबत चौकशी करताना त्यांनी त्या हॉटेलमधील काही स्टाफच्या जबान्याही नोंदविल्या. मात्र त्याबाबतचा तपशील मिळालेला नाही.