ऑनलाइन फसवणुकीसाठी नवे फंडे, मोबाइल देणे पडू शकते महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 10:29 AM2021-08-20T10:29:47+5:302021-08-20T10:42:37+5:30

online fraud : अनोळखी व्यक्तींकडून मोबाईलचा दुरुपयोग होऊ शकतो.

मुंबई : ओटीपी शिवाय व्यवहार पूर्ण होत नाही. त्यामुळे सायबर ठग हे ओटीपी क्रमांक मिळविण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढविताना दिसत आहेत.

त्यामुळे कुणालाही आपला ओटीपी क्रमांक शेअर करू नका. दुसरीकडे अनोळखी व्यक्तीच्या हातात ही मोबाईल देणे महागात पडू शकते. असे सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.

एटीएम, क्रेडिट कार्ड ब्लॉक झाले आहे. बँक खाते, पेटीएम खाते, गुगल पे, फोन पे खात्याची तसेच, मोबाईल नंबरची केवायसी अपडेट करायची आहे.

केवायसी न केल्यास संबंधित खाते, मोबाईल क्रमांक, कार्ड बंद होईल अशी भीती घालून ही मंडळी मोबाईलवर एक लिंक धाडून डेबिट, क्रेडिट कार्ड, बँक खात्याची माहिती भरुन घेतात.

किंवा एखादे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडतात तसेच मोबाईलवर क्युआर कोड पाठवून तो स्कॅन करण्यास सांगतात.

असे केल्याने आपल्या बँकेच्या खात्याची संपूर्ण माहिती आरोपीला कळते आणि त्या आधारे तो सायबर ठग ऑनलाईन रकमेवर हात साफ करत आहे.

तसेच ही लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे चोरतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात.

अनोळखी व्यक्तींकडून मोबाईलचा दुरुपयोग होऊ शकतो. तुमच्या बँक तपशीलासह मोबाईलवरील ओटीपी ही मिळवू शकतात. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांकड़ून देण्यात येत आहे.

बॅंक, शासकीय अधिकारी कधीही फोन वरून आपला ओटीपी क्रमांक मागत नाहीत. त्यामुळे कुणालाही आपली गोपनीय माहिती शेअर करू नका. अनोळखी लिंक तसेच ॲप डाऊनलोड करू नये. जेथे फसवणूक होतेय असे वाटत असल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचे ही सायबर पोलिसांकड़ून सांगण्यात येत आहे.

कॉल करण्यासाठी मोबाईल घेऊन, मोबाईल बंद पडला आहे, गावी तसेच कुटुंबीयांना महत्त्वाचा कॉल करायचा असल्याचे सांगत आपला मोबाईल घेऊन दुरुपयोग होऊ शकतो. 

विविध शॉपिंग तसेच रियालिटी शो च्या नावाखाली फ्री गिफ्टचं आमिष दाखवून ओटीपी मिळविण्याचा प्रयत्न केला जातो.

लॉटरी लागल्याचे सांगून देखील ठग मंडळी बँकेचा तपशील घेऊन फसवणूक करतात.

सीमकार्ड, बँकेची केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली ओटीपी मिळवून फसवणूक करण्यात येते.