बहिणीशी फोनवरून साधला अखेरचा संवाद अन् काही क्षणात ५ जणांचं आयुष्य संपलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 12:07 PM2022-10-25T12:07:00+5:302022-10-25T12:14:13+5:30

रविवारी सायंकाळी उशिरा बस्ती जिल्ह्यातील मुंदरवा भागातील खजौलाजवळ महामार्गावर झालेल्या अपघातात दाम्पत्यासह कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. याची माहिती कोतवाली परिसरातील धोडही गावात पोहोचताच एकच खळबळ उडाली. गावातील सर्व लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

दिवाळी साजरी करण्यासाठी गावी येत असलेल्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याने गावातील लोकांवर शोककळा पसरली. गावातील रहिवासी विनोद कुमार (३८) हे लखनौमधील जल निगममध्ये AE म्हणून तैनात होते. एई विनोद कुमार हे त्यांच्या आई-वडिलांचा एकुलता एक होते. ते लखनऊमध्ये पत्नी आणि मुलगा आणि मुलीसह राहत होते. त्यांची एकुलती एक मोठी बहीण उषा हिचे लग्न काटवाली गावात झाले आहे.

१४ सप्टेंबर २०२२ रोजी विनोदच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या कार्यक्रमानंतर ते ६ ऑक्टोबरला त्यांची आई सुरसतीदेवी यांनाही सोबत घेऊन लखनौला गेले. रविवारी दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी विनोद लखनौहून कारने आपल्या गावी येत होते. सोबत पत्नी नीलम (३४), मुलगी श्रेया गौतम (१३), मुलगा सत्य गौतम (१२) आणि आई सुरसती देवी (६५) होते.

सायंकाळी उशिरा बस्ती जिल्ह्यातील खजौलाजवळ महामार्गावरील उभ्या असणाऱ्या कंटेनरला कार धडकली. या अपघातात विनोद कुमार गौतम, पत्नी नीलम गौतम, मुलगी श्रेया गौतम, आई सुरसती देवी यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी मुलगा यथार्थ गौतम याचा बस्ती रुग्णालयात मृत्यू झाला.

माजी सरपंच संतोष कुमार यांनी सांगितले की, एई विनोद कुमार यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांच्या मृत्यूने गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिवाळीच्या सणावर विरजन पडलं आहे. या दुर्घटनेमुळे गावात आणि आसपासच्या लोकांनी दीपावलीचा सण साजरा केला नाही.

बस्तीला पोहोचण्यापूर्वी विनोद कुमार यांचं बहिणीशी फोनवर अखेरचं बोलणं झालं. गावकरी आणि मृताच्या पुतण्याने सांगितले की, विनोद बस्तीवर पोहोचण्यापूर्वी बहीण उषा देवी यांच्याशी फोनवर बोलणे झाले. तो काही वेळात घरी पोहोचेल असं त्याने बहिणीला फोनवर सांगितले

मात्र काही वेळाने अशी दुर्घटना घडल्याचं कळालं. कुटुंबातील पाचही सदस्यांच्या मृत्यूची बातमी बहीण व पुतण्यांच्या कानावर येताच ते सर्वजण ढसाढसा रडू लागले. खजौला चौकीच्या पोलिसांनी गावच्या ग्रामस्थांना फोनद्वारे अपघाताची माहिती दिली. या घटनेमुळे सगळीकडे शांतता पसरली होती. ऐन दिवाळीत लोकांच्या उत्साह अचानक विरून गेला.

या भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त होत आहे. वेगानं आलेल्या कारनं हायवेवर उभ्या असणाऱ्या कंटेनरला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती ज्यामुळे कार पूर्णत: कंटेनरमध्ये घुसली. या दुर्घटनेत पती-पत्नी, आई-मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. तर जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये नेताना त्याने वाटेतच जीव सोडला.

विनोद कुमार हे प्रयागराजमधील जल निगममध्ये AE म्हणून तैनात होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब लखनौमध्ये राहत होते. रविवारी विनोद कुमार (४२) हे त्यांची आई सरस्वती, पत्नी नीलम (३४), मुलगी श्रेया आणि मुलगा यथार्थ यांच्यासह संत कबीरनगर येथे दिवाळी साजरी करण्यासाठी कारने जात होते. ते मूळचे खलीलाबाद परिसरातील हरपूर धोडही येथील रहिवासी होते. ब्रेझा कारमधील संपूर्ण कुटुंब लखनौहून निघाले होते.

विनोद कुमार हे कुटुंबासह लखनौमध्ये राहत होते. त्यांचा मुलगा आणि मुलगी लखनौमध्येच शिकत असत. बरेच दिवस होऊनही ते गावी आले नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यामुळे यावेळी दिवाळी साजरी करण्यासाठी घरी जात होते. अपघात झाला तेथून त्याच्या घराचे अंतर फक्त १७ किलोमीटर होते. या अपघातात संपूर्ण कुटुंबाचा क्षणार्धात मृत्यू झाला. आता कुटुंबात कोणीही उरले नाही. विनोदच्या वडिलांचे महिनाभरापूर्वीच निधन झाले होते.