बँक खात्यात काहीच बॅलेन्स नाही? ‘या’ योजनेतून मिळवा १० हजारांची रक्कम; कसा होईल धनलाभ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:34 PM2022-08-30T12:34:28+5:302022-08-30T12:40:49+5:30

अनेकदा बॅंक खात्यात बॅलेन्स शिल्लक ठेवताना तारेवरची कसरत करावी लागते. तुमच्याकडे आहे का ही योजना? जाणून घ्या, डिटेल्स...

अनेकदा आपल्याला पैशांची चणचण भासते. अगदी कट टू कट नियोजनामुळे बँक खात्यात बॅलेन्स शिल्लक ठेवताना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, अशावेळी एक अशी योजना आहे, याचा वापर करून तुम्ही लगेचच १० हजारांची रक्कम मिळवू शकता. या योजनेचा लाभ कसा मिळू शकतो? जाणून घ्या...

केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक म्हणजे पंतप्रधान जन-धन योजना. या योजनेद्वारे देशातील गरीब घटकांना मुख्य बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत लाखो गरीब कुटुंबांची बँकांमध्ये खाती उघडण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ४६.२५ कोटी लोकांची खाती उघडण्यात आली आहेत.

देशातील सर्व घटकांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे हा जन-धन योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या मदतीने केंद्र सरकारने कोरोना महामारीच्या काळात गरिबांना पाठवलेली आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली. यासोबतच पंतप्रधान किसान सन्मान निधीसह इतर योजनांतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले.

ग्राहक हे खाते शून्य शिल्लक वर उघडू शकतात. हे खाते उघडून तुम्ही अनेक सुविधांचा फायदा घेऊ शकता. या योजनेद्वारे लाखो लोकांना बँकेत खाते उघडण्याची सुविधा मिळाली. आज या योजनेला (PMJDY) आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेत आतापर्यंत किती लोकांनी खाती उघडली आहेत आणि त्यांना कोणते फायदे मिळतात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

ही योजना गरिबांसाठी एका वरदानापेक्षा कमी नाही. या योजनेतील सर्वांत मोठी सुविधा म्हणजे ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे. कोणताही खातेदार ओव्हरड्राफ्ट सुविधेचा वापर करू शकतो, पण यासाठी तुम्हाला तुमच्या बँक व्यवस्थापकाशी बोलणे आवश्यक आहे.

ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील एक प्रकारचा कर्ज आहे. जर बँकेने तुम्हाला परवानगी दिली तर तुम्ही हे पैसे काढू शकता. ओव्हरड्राफ्ट सुविधेवर तुम्हाला दररोज व्याज द्यावे लागेल. यापूर्वी पंतप्रधान जन धन खात्यात ५ हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा देत द्यायचे. आता ती १० हजार रुपये करण्यात आली आहे.

ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळवण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान ६ महिने जुने असावे. तसेच जर तुमचे खाते ६ महिने जुने नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला फक्त २००० रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळेल.

सरकारच्या या योजनेअंतर्गत तुम्ही खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे. यामध्ये १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचे बँक खाते उघडता येते. खाते उघडणाऱ्यांना रुपे डेबिट कार्ड मिळते. त्याचवेळी एटीएम कार्डवर दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे.

शासनाच्या या योजनेत आतापर्यंत ४६.२५ कोटी लाभार्थ्यांची खाती उघडण्यात आली आहेत. त्याचवेळी उघडलेल्या बँक खात्यांमध्ये १,७३,९५४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच मार्च २०१५ मध्ये या योजनेंतर्गत खात्यांची संख्या १४.७२ कोटी होती. त्याचवेळी १० ऑगस्ट २०२२ पर्यंत तीन पटीने वाढून ४६.२५ कोटी झाले आहे.