शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 05:13 AM2024-06-17T05:13:36+5:302024-06-17T05:14:09+5:30

कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमधून  भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे निवडणूक लढवीत आहेत.

Infiltration of NGOs by Urban Naxalites | शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :   फेक नॅरेटिव्ह पसरविण्यात विरोधकांसोबत काही एनजीओ कार्यरत होत्या. गडचिरोलीतील शहरी नक्षलवाद्यांनी आता या एनजीओंमध्ये शिरकाव केला आहे. तेच सरकारविरोधी काम करीत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर शिवसेनेचे १९ टक्के मतदान होते त्यापैकी १४.५ टक्के मतदान हे शिंदेसेनेला  आहे, तर साडेपाच टक्के उद्धवसेनेला. म्हणजेच उर्वरित मतदान कुठले आहे, ते सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे आता जागरूक राहा. यापुढे पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तर कोणीही गाफील राहू  नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमधून  भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे निवडणूक लढवीत आहेत. डावखरे यांच्या प्रचारासाठी  रविवारी ठाण्यात झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी आमदार डावखरे यांच्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण,  भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह राष्ट्रवादी, मनसे आणि रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत गाफीलपणा भोवल्याचे कबूल  करत मुख्यमंत्री म्हणाले,  विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विकासाचे खरे नॅरेटिव्ह तयार करून विजय मिळवावा. मोदी द्वेषाने पछाडलेले  हे शहरी नक्षलवादी मोदी हटाव म्हणून घोषणा देत होते; पण मोदी हटले नाही आणि ते पुन्हा सत्तेत आले. मात्र, चांगले काम  करूनही खोटे नॅरेटिव्ह पसरविण्यात काँग्रेस यशस्वी ठरली, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

कीर कीर कशाला...डायरेक्ट डावखरे  
गेल्यावेळी संजय मोरे आणि नजीब मुल्ला हे दोन्ही प्रतिस्पर्धी होते. ते उमेदवारही महायुतीत आहेत. त्यामुळे, ८५ टक्क्यांऐवजी आता १०० टक्के मतदान निरंजन डावखरे यांना मिळेल, असे भाकीत मुख्यमंत्र्यांनी केले.  समोर उमेदवार कोण आहे, त्याची कीर कीर कशाला... डायरेक्ट डावखरे यांनाच पसंती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

विरोधकांना केले तडीपार : फडणवीस
लोकसभा निवडणुकीत काही लोकांनी महायुतीला तडीपार करण्याची घोषणा केली होती. मात्र, कोकणात महायुतीला प्रचंड यश मिळून, कोकणाने त्यांना तडीपार केले. कोकणातील साडेसहापैकी साडेपाच जागा महायुतीने जिंकल्या. आता या निवडणुकीतही महायुतीला आशीर्वाद मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईतील दोन, कोकण आणि नाशिक या चारही जागांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वासही  फडणवीस यांनी व्यक्त केला.

Web Title: Infiltration of NGOs by Urban Naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.