रतन टाटांशी पंगा महागात! सायरस मिस्त्रींची कंपनी मुकेश अंबानींनी २ हजार ८४५ कोटींना केली खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 03:36 PM2022-02-11T15:36:21+5:302022-02-11T15:40:43+5:30

मुकेश अंबानींच्या रिलायन्सने सायरस मिस्त्री प्रमोटर असलेल्या कंपनीतील मोठा हिस्सा खरेदी केला आहे.

जगातील एक दिग्गज उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांच्याशी टाटा सन्समध्ये वरिष्ठ पदावर असलेल्या सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांनी काही काळापूर्वी पंगा घेतला होता. रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. याच सायरस मिस्त्री यांची एका कंपनीतील ४० टक्के हिस्सा रिलायन्स इंडस्ट्रिजने (Reliance Industries) खरेदी केला आहे.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने सायरस मिस्त्री प्रमोटर असलेल्या शापूरजी पालोनजीमधील स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जीमधील तब्बल ४० टक्के वाटा २ हजार ८४५ कोटी रुपयांना खरेदी केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्स कंपनी हरित ऊर्जा क्षेत्रात आक्रमकपणे काम करत असून, हजारो कोटींची गुंतवणूक मुकेश अंबानी यांनी यासाठी केली आहे. अलीकडेच यासंदर्भातील आपली योजनाही मुकेश अंबानी यांनी जाहीर केली होती.

ऑक्टोबर २०२१ मध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने स्टर्लिंग अँड विल्सन सोलर रिन्युएबल एनर्जी या कंपनीतील ४० टक्के हिस्सा खरेदी करण्यासंदर्भातील करार केला होता. या कंपनीच्या प्रमोटर्समध्ये सायरस मिस्त्री यांचा समावेश आहे.

याशिवाय शापूरजी पालोनजी या कंपनीने अमेरिकेतील एका खासगी इक्विटी फर्म असलेल्या एडवेंट इंटरनॅशनल कंपनीसोबत यूरेका फोर्ब्ससाठी ४ हजार ४०० कोटी रुपयांचा करार केला होता. मात्र, यानंतर आता रिलायन्ससोबत झालेला करार पूर्णत्वास जात आहे.

हा सौदा रिलायन्स न्यू एनर्जी सोलर, शापूरजी पालोनजी अँड कंपनी, खुर्शीद दारूवाला आणि स्टर्लिंग अँड विल्सन सोलर यांमध्ये होत आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजने शेअर बाजाराला याबाबत माहिती दिली आहे.

रिलायन्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रिजने स्टर्लिंग अँड विल्सन सोलर रिन्युएबल एनर्जी कंपनीतील ४० टक्के हिस्सा खरेदी केला असून, हा सौदा २ हजार ८४५ कोटी रुपयांना झाला आहे.

दरम्यान, शापूरजी पालोनजी समूहाची टाटा सन्समध्ये १८.३७ टक्के हिस्सेदारी आहे. पालोनजी मिस्त्री यांचे सुपुत्र सायरस मिस्त्री यांना २०१२ मध्ये रतन टाटा यांच्या जागी चेअरमन करण्यात आले होते. मात्र, २०१६ मध्ये सायरस मिस्त्री यांना पदावरून हटवण्यात आले. यानंतर रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वाद विकोपाला गेला. शापूरजी पालोनजी समूहाचा सर्व हिस्सा टाटा समूहाने खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, तो व्यवहार झाला नाही.