अंबानी खुश हुए! कर्मचाऱ्याला थेट २२ मजल्यांची इमारत गिफ्ट; किंमत तब्बल १५०० कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 12:33 PM2022-02-10T12:33:28+5:302022-02-10T12:36:47+5:30

मुकेश अंबानींची कृपादृष्टी; मुंबईतील महागड्या भागात कर्मचाऱ्याला २२ मजल्यांचं घर गिफ्ट

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांनी त्यांचा उजवा हात असलेल्या मनोज मोदींना शानदार गिफ्ट दिलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मोदी अंबानींसाठी काम करत आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणाचं फळ म्हणून अंबानींनी त्यांना एक आलिशान इमारत गिफ्ट केली आहे.

अंबानींनी मोदींना २२ मजल्यांची इमारत गिफ्ट दिली आहे. मुंबईतल्या नेपियन सी या महागड्या भागात ही इमारत उभी आहे. तिची किंमत जवळपास १५०० कोटी रुपये इतकी आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (आरआयएल) चेअरमन असलेल्या मुकेश अंबानी यांनी मनोज यांना गिफ्ट केलेल्या इमारतीचं नाव क्रिस्टेनेड वृंदावन आहे. आरआयएलच्या जडणघडणीत मोदींचं योगदान मोठं आहे. त्यांच्या याच कामगिरीबद्दल त्यांचं कौतुक म्हणून अंबानींनी मनोज मोदींना महागडं घर गिफ्ट केलं आहे.

वृंदावन इमारतीमधील प्रत्येक मजल्यावर ८ हजार चौरस फूट इतकी जागा आहे. संपूर्ण बंगल्याचा विचार केल्यास हा आकडा १.७ लाख चौरस फुटांच्या घरात जातो. बंगल्यातील इंटिरियरचं काम तलती एँड पार्टनर्स एलएलपीकडून करण्यात आलं आहे.

बंगल्यातील सर्व फर्निचर इटलीहून मागवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यातील अनेक वस्तू मुकेश आणि नीता अंबानी यांनी स्वत: खरेदी केल्या आहेत. वृंदावनच्या छतावर इन्फनाईट स्वीमिंग पूल आहे. पुलाच्या एका टोकाला अरबी समुद्राचं दृश्य दिसतं.

इमारतीच्या १९ आणि २१ व्या मजल्यांवर पेंटहाऊस आहे. तिथे मोदी त्यांच्या कुटुंबासोबत राहतील. १६ ते १८ मजल्यांवर त्यांची मोठी मुलगी खुशबू पोद्दार, तिचे पती राजीव पोद्दार, सासरे अरविंद आणि सासू विजयालक्ष्मी पोद्दार वास्तव्याला असतील. पोद्दार परिवाराकडे बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेडची (बीकेटी) मालकी आहे.

११ ते १३ मजल्यांवर मोदी यांची लहान मुलगी भक्ती मोदी राहील. भक्ती रिलायन्स रिटेलमध्ये इशा अंबानींसोबत काम करते. १४ व्या मजल्यावर मोदींचं कार्यालय असेल. १५ व्या मजल्यावर इन हाऊस मेडिकल, आयसीयू सेट अप, पूजा कक्ष आहे.

इमारतीच्या ८ ते १० व्या मजल्यावर मनोरंजनाच्या सुविधा आहेत. अत्याधुनिक खेळांच्या सोयी या ठिकाणी आहेत. पार्टी रुम, फॉर्मल मीटिंग एरिया, स्पा, ५० प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेलं थिएटर याच भागात आहे. पहिल्या सात मजल्यांवर पार्किंगची सोय आहे.

मोदी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी १७५ कर्मचारी हजर असतील. त्यात ख्यातनाम शेफ, व्यवस्थापकांचा समावेश असेल. इमारतीच्या सुरक्षेसाठी खास काळजी घेण्यात आली आहे. सुरक्षेची यंत्रणा इस्रायलस्थित कंपनीनं डिझाईन केली आहे.