१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 11:50 IST2026-05-16T11:46:01+5:302026-05-16T11:50:28+5:30

Tarot Card May 17 to 23: टॅरो कार्डनुसार १७ ते २३ मे चे साप्ताहिक भविष्य तुमच्या मूलांकानुसार जाणून घ्या. पुण्याचे टॅरो कार्ड रीडर सुमेध रानडे यांनी तुमच्या जन्मतारखेनुसार केलेले मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.

हा सप्ताह तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल पण तरीसुद्धा आणखी पुढे काहीतरी करायला हवं अशी भावना येईल. भौतिक सुखसोयींपासून एक प्रकारची विरक्ती येऊ शकते. कामामध्ये विलंब होऊ शकतो. एखादं अवघड ध्येय साध्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकाल! या आठवड्यात तुम्हाला नक्की काय हवं आहे, याचा नीट विचार करा आणि त्याप्रमाणे पुढे चाला. उथळ गोष्टींमध्ये अडकून राहू नका. भावनांमध्ये, भूतकाळात किंवा नैराश्यात अडकून राहू नका. उपासना किंवा मेडिटेशन करा, एकांतात वेळ घालवा.

हा सप्ताह तुमच्यासाठी भावनांचे प्राधान्य घेऊन येत आहे. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील. समजून घेणारे लोक भेटतील. कलेला वाव मिळेल. काही प्रमाणात राजकारण घडू शकतं. कामामध्ये विशिष्ट टप्पा गाठला जाईल. या आठवड्यात तुम्हाला तुमचं वागणं बोलणं चांगलं आणि सुसंस्कृत ठेवण्याची गरज आहे. ऐकावं जनाचं करावं मनाचं, याप्रमाणे वागा. मोठ्यांसमोर नमतं घ्या. कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. तुमच्या जवळच्या व्यक्तींची चांगली काळजी घ्या!

हा सप्ताह तुमच्यासाठी खूप काम आणि कष्ट करण्याचा असणार आहे. जे करत आहात त्यात तुम्हाला प्राविण्य मिळेल. पण तुम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही. तरीही तुम्ही संपन्न आणि आनंदी रहाल. तुमच्या कुठल्यातरी भौतिक, आर्थिक ध्येयाच्या दिशेने चांगली वाटचाल कराल. काम परिपूर्णतेकडे जाईल. या आठवड्यात तुम्हाला बाकी कसलाही विचार न करता पूर्ण लक्ष तुमच्या कामाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचे आहे. वैयक्तिक गोष्टींत अडकू नका. चुका दुरुस्त करून, सुधारणा करा. स्वावलंबी व्हा!

हा सप्ताह तुमच्यासाठी स्थैर्य आणि दिलासा घेऊन येत आहे. तुम्ही तुमच्या कामात संथ पण सबळ वाटचाल करणार आहात. काही अडथळे किंवा अडचणी येऊ शकतात पण त्यातून तुम्ही आणखी मजबूत आणि सक्षम होणार आहात. प्रवास घडू शकतात. आर्थिक गोष्टी मार्गी लागतील. पण फळ मात्र सावकाश मिळेल! या आठवड्यात तुम्ही कामात खूप कष्ट करा. जीव ओतून प्रामाणिक प्रयत्न करा. घाई न करता कोणतेही काम अधिक चांगले आणि परिपूर्ण कसे करता येईल याकडे लक्ष द्या.

हा सप्ताह तुमच्यासाठी वेगवान असणार आहे. तुमचे अडलेले काम नक्कीच या काळात मार्गी लागणार अशी खूप शक्यता आहे. तुम्हाला कुठेतरी सारखी ये जा करावी लागू शकते. लगीनघाई असल्यासारखे वाटेल. चांगल्या कामासाठी धावपळ होईल. हवी असलेली बातमी येईल किंवा त्यासंबंधी काही माहिती कळेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्याकडून कोणताही उशीर करु नका. तुमचे संभाषण संवाद यांकडे लक्ष द्या. काही कामांचा आपणहून पाठपुरावा करा. जितके कष्ट कराल तितके फळ हे निश्चित!

हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक आणि आर्थिक सक्षमता घेऊन येत आहे. आर्थिक कामे अडलेली असतील तर ती आता मार्गी लागतील. आहात त्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत पोचाल. एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरी व्यवसायामध्ये चांगले यश संभवते. आरोग्य सुधारेल. या आठवड्यात एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन मग आर्थिक निर्णय घ्या. एखाद्या अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन खूप उपयोगी पडेल. इतरांसाठी आधार बना. स्वार्थापलीकडे जाऊन लोकसेवा करा.

हा सप्ताह तुमच्यासाठी एखादी नवीन संधी घेऊन येणार आहे. नवीन भौतिक आनंद, सुख सोयी अनुभवता येतील. अडकलेले काम सुटेल. कौटुंबिक सुख समृद्धी राहील. एकूण परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली होईल. घर, गाडी, नोकरी, व्यवसाय, जमिनीचे काम यासंदर्भात प्रगती होईल. या आठवड्यात तुम्ही सावकाश आणि चिकाटीने काम करण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन योजना मांडा. नवीन सुरुवात करायची असेल तर करा. काम होण्याची शक्यता आहे पण ते पूर्ण होण्यासाठी संयम ठेवा!

हा सप्ताह तुमच्यासाठी देवाण घेवाण करणारा असणार आहे. भौतिक किंवा आर्थिक पातळीवर लाभ होऊ शकतात. अडकलेल्या कामात काही प्रमाणत पुढे जाऊ शकता. आहे ती परिस्थिती सुधारेल, एक प्रकारची स्थिरता वाटेल. अडकलेले पैसे सुटू शकतात. एखादे बक्षीस मिळू शकते. या आठवड्यात तुम्ही इतरांना मदत करून आणि इतरांच्या मदतीने चालण्याची गरज आहे. गरजू व्यक्तीला केलेली मदत तुम्हाला उपयोगी पडेल. इतरांशी वागताना बोलताना पक्षपातीपणा न करता काम करा.

हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. आत्तापर्यंत सुरू असलेल्या समस्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. तुम्ही आतुरतेने वाट बघत असलेले उत्तर किंवा प्रतिसाद मिळेल. एका अर्थी तुम्ही सुटकेचा निःश्वास टाकाल. तुम्ही करत असलेली प्रार्थना किंवा उपासना यांना बळ मिळेल. या आठवड्यात तुम्ही परिस्थितीला तोंड देताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमची साधना फलित होईल असा विश्वास ठेवा. "सुरवंटाचेच फुलपाखरु होते" हे लक्षात ठेवा!

या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता. ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com