"माझ्या दुःखाचे कारण माझी पत्नीच..." लग्नानंतर ९ वर्षांनी इंजिनिअरने संपवले जीवन, व्हॉट्सॲपवर ठेवला स्टेटस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 11:07 IST2026-05-16T11:07:28+5:302026-05-16T11:07:44+5:30
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका ३३ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आपले आयुष्य संपवले.

"माझ्या दुःखाचे कारण माझी पत्नीच..." लग्नानंतर ९ वर्षांनी इंजिनिअरने संपवले जीवन, व्हॉट्सॲपवर ठेवला स्टेटस
"मी आयुष्याची लढाई हरलोय यार... खूप दुःख सहन केलंय आणि हे दुःख देणारी दुसरी कोणी नसून माझी स्वतःची पत्नीच आहे. मी चुकीचे पाऊल उचलतोय हे मला ठाऊक आहे, पण या त्रासातून सुटण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता..." हे मन हेलावून टाकणारे शब्द आहेत उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये आत्महत्या केलेल्या एका ३३ वर्षीय तरुण इंजिनिअरचे. पत्नीच्या छळाला आणि कोर्टाच्या फेऱ्यांना कंटाळून या तरुणाने कुसमीच्या घनदाट जंगलात झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या मोबाईलवर एक व्हिडिओ बनवून तो व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला होता, जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रद्युम्न यादव असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी इंजिनिअरचे नाव आहे. तो कुशीनगर जिल्ह्यातील रहिवासी होता आणि इंदूर येथे एका कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
९ वर्षांपूर्वी झाले होते लग्न, ३ महिन्यांतच सुखाचा संसार मोडला
मिळालेल्या माहितीनुसार, प्रद्युम्नचा विवाह २ जून २०१७ रोजी अर्पिता यादव हिच्याशी झाला होता. त्यांना ५ वर्षांची एक मुलगीही आहे. लग्नानंतर सुरुवातीचे ३ महिने अर्पिता सासरी राहिली, मात्र त्यानंतर ती माहेरी निघून गेली. काही महिन्यांनंतर प्रद्युम्न तिला आपल्यासोबत दिल्लीला घेऊन गेला, जिथे तो नोकरी करत होता. मात्र, तिथेही त्यांच्यात वाद सुरूच राहिले. कुटुंबियांच्या आरोपानुसार, अर्पिताने दिल्लीत प्रद्युम्नचा गळा दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर तिला पुन्हा माहेरी पाठवण्यात आले.
हुंडा आणि पोटगीचा खटला; कोर्टाच्या तारखांमुळे मानसिक तणाव
माहेरी गेल्यानंतर अर्पिताने पती प्रद्युम्नविरुद्ध हुंडा छळ आणि पोटगीसाठी न्यायालयात खटला दाखल केला. याच केसच्या सुनावणीसाठी प्रद्युम्न १० मे रोजी इंदूरहून कुशीनगरला आला होता. १२ मे रोजी कोर्टात सुनावणी झाली, मात्र कोर्टाने पुढील तारीख थेट २१ जुलै दिली. वारंवार ऑफिसमधून सुट्ट्या काढून कोर्टाच्या चकरा मारणे आणि पत्नीकडून मिळणारा मानसिक त्रास यांमुळे प्रद्युम्न प्रचंड नैराश्यात होता.
मंदिरात दर्शन घेतले आणि जंगलात संपवले जीवन
कोर्टाच्या सुनावणीनंतर प्रद्युम्न कुशीनगर येथील आपल्या बहिणीच्या घरी गेला. तिथून त्याला इंदूरला जाण्यासाठी ट्रेन पकडायची होती. कुशीनगरहून गोरखपूरला येत असताना वाटेत प्रसिद्ध 'बुढिया माईचे मंदिर' लागते. प्रद्युम्नने आधी मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. देवदर्शन आटोपल्यानंतर तो गोरखपूरपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसमी जंगलात गेला आणि तिथे एका झाडाला गळफास लावून त्याने आत्महत्या केली.
मोठ्या भावाला संदेश: "आई-बाबांना भासू देऊ नको की..."
आत्महत्येपूर्वी प्रद्युम्नने अत्यंत भावूक व्हिडिओ बनवून स्टेटसवर पोस्ट केला. व्हिडिओमध्ये तो म्हणाला, "गेल्या दीड महिन्यांपासून माझ्या डोक्यात हाच विचार सुरू होता. आज तो दिवस आलाय. मला माझ्या मोठ्या भावाला एकच सांगायचे आहे- 'भावा, आई-वडिलांना कधीही हे जाणवू देऊ नकोस की त्यांचा एक मुलगा या जगात नाही. प्रत्येक आई-वडिलांना वाटते की म्हातारपणात मुलगा त्यांचा आधार बनेल, पण मी आधार बनण्याऐवजी त्यांना आयुष्यभराचे दुःख देऊन जात आहे. मला माहित आहे माझ्या जाण्याने त्यांना किती त्रास होईल, पण माझ्या स्वतःच्या वेदनांपुढे मी त्यांचे दुःख विसरलो आहे.'"
गुरुवारी जंगलात प्रद्युम्नचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली आणि त्याच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली. या हृदयद्रावक घटनेमुळे यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.