मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 10:09 IST2026-05-16T10:07:50+5:302026-05-16T10:09:32+5:30

Missing Link Accident News: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक परिसरात शुक्रवारी अवघ्या काही तासांच्या अंतरात दोन भीषण अपघातांच्या घटना घडल्या.

Two horrific accidents within a few hours near 'Missing Link'; Three killed, many injured | मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!

मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक परिसरात शुक्रवारी अवघ्या काही तासांच्या अंतरात दोन भीषण अपघातांच्या घटना घडल्या. या दुर्दैवी घटनांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या दुहेरी अपघातांमुळे संपूर्ण महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या सर्व अपघातग्रस्त वाहने हटवण्यात आली असून संथ गतीने वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, तीन ठार

पहिली घटना शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ढेकू गावच्या हद्दीत, मुंबई मार्गिकेवर मिसिंग लिंक संपणाऱ्या ठिकाणाजवळ घडली. खंडाळा घाटातील तीव्र उतारावरून येत असताना एका ट्रकचे ब्रेक फेल झाले. नियंत्रण सुटलेल्या या ट्रकने पुढील दोन ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात संजीव डांगे (वय, ५२) नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील ट्रकमध्ये रंगाचे साहित्य आणि पुट्टी भरलेली होती, जी अपघातानंतर रस्त्यावर पसरल्याने दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक ठप्प झाली.

भरधाव बसची तीन कारला धडक, ४ जण जखमी

या अपघाताच्या काही तासांतच मिसिंग लिंक परिसरातील एका बोगद्याजवळ दुसरा भीषण अपघात घडला. एका वेगवान बसने पुढे जाणाऱ्या तीन खाजगी कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या 'हेल्प फाउंडेशन' आणि महामार्ग पोलिसांच्या बचाव पथकाने गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर गॅस कटरच्या साहाय्याने गाड्यांचे पत्रे कापून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बचावकार्य आणि वाहतूक कोंडी

सलग झालेल्या या दोन अपघातांमुळे वीकेंडला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. सुमारे दोन तास महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी यंत्रणा आणि हेल्प फाउंडेशनच्या टीमने तातडीने क्रेन मागवून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. रस्त्यावर पसरलेला रंग आणि पुट्टी साफ केल्यानंतर सुरुवातीला एक लेन सुरू करण्यात आली. 

वेग आणि तांत्रिक बिघाड चिंतेचा विषय

नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान झाला असला, तरी चालकांचा अतिवेग, निष्काळजीपणा आणि तीव्र उतारावर वाहनांचे ब्रेक फेल होणे यांमुळे या परिसरातील अपघातांचे प्रमाण वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी चालकांना घाटातून प्रवास करताना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आणि वाहनांची तांत्रिक तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे: मिसिंग लिंक पर दो दुर्घटनाएँ, तीन की मौत।

Web Summary : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे के मिसिंग लिंक पर दो दुर्घटनाओं में तीन की मौत हो गई और कई घायल हो गए। एक ट्रक के ब्रेक फेल होने से एक दुर्घटना हुई, जिसमें तीन मारे गए। एक बस ने तीन कारों को टक्कर मार दी, जिसमें चार घायल हो गए। दुर्घटनाओं से भारी ट्रैफिक जाम हो गया। तेज गति और खराब वाहन चिंता का विषय हैं।

Web Title : Mumbai-Pune Expressway: Two accidents on Missing Link, three dead.

Web Summary : Three died and many injured in two accidents on the Mumbai-Pune Expressway's Missing Link. A truck's brake failure caused one accident, killing three. A bus rear-ended three cars in another, injuring four. The accidents caused major traffic delays. Over speeding and faulty vehicles are a concern.